रविवारी दिल्लीगेट वेस समोर होणार आंदोलन
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीष दाखवून व जातीच्या नावाने मतं घेऊन निवडून आलेल्या संसदीय लोकशाहीतील सत्तापेंढार्यांना सत्ताकारणातून कायमचे दूर करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने राष्ट्रीय गीताभारत डिच्चू आंदोलन जारी करण्यात आले आहे. रविवारी (दि.5 मार्च) सकाळी 11 वाजता शहराच्या ऐतिहासिक दिल्लीगेट वेस समोर हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर 75 वर्ष केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तापेंढार्यांनी मतदारांना पैसे, दारु, कोंबडी देऊन व जातीच्या नावावर मतं घेऊन अनेकपिढया सत्ता ताब्यात ठेवली. सत्ता राबवित असताना त्यांनी फक्त स्वत:चे हित साधले, यामुळे स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्यांना मिळाली नाहीत. भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये पोसल्या गेलेल्या या विष वृक्षांच्या मुळावर कायमचा हल्ला करण्यासाठी रागील डिच्चू कावा करण्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पांडवांवर झालेला आर्थिक, सामाजिक, राजकीय अन्यायाबरोबरच जिवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणार्या कौरवांच्या विरुध्द गीताभारतामुळे न्यायाची स्थापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये गीताभारतातील तत्व प्रणाली ही मुळगाभा राहिली आहे. गीताभारतामुळे स्थापित झालेल्या न्याय प्रणालीचा वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केल्याने कोटयावधी अमानवी वृत्तींचा नायनाट झाला. यातना सोसणार्यांना माणूस म्हणून जगण्याचा आधिकार मिळाला. त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायग्रस्त रयतेला गीताभारतातून प्रेरणा घेऊन उन्नतचेतनेद्वारे आणि तुफानी उर्जेच्या माध्यमातून स्वराज्याची उभारणी केली. या सर्व अन्याय नष्ट करणार्या प्रेरणेच्या मागे राष्ट्रीय गीताभारत लढयातील डिच्चू कावा कारणीभूत ठरला असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ताधार्यांनी जनतेची तिजोरी वाहून घरी नेली. लोक गीताभारतापासून लांब राहिल्यामुळे त्यांना स्वकीय आधुनिक कौरवांविरुध्द लढण्याची उर्मी राहिली नाही. त्यामुळे शहरात खड्डेच खड्डे आणि सगळीकडे बेरोजगारी, झोपडपट्ट्यांचा विस्तार हे प्रश्न दिसत आहेत. राष्ट्रीय गीताभारत लढयाबद्दल आस्था निर्माण करुन सत्ता पेंढार्यांना डिच्चू कावा देण्यासाठी ही मोहिम घराघरात आणि जनमनात राष्ट्रीय गीताभारत डिच्चू आंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेली जाणार असल्याचे संघटनेचा प्रयत्न आहे. यासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.