मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे बुधवारी (दि.17 ऑगस्ट) श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
श्री. स्वामी विवेकानंद ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष गोरखनाथ राजाराम हिंगे आणि माजी सरपंच पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांच्या श्रध्दापूर्वक आर्थिक दातृत्वातून हा धार्मिक प्राणप्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा होणार आहे. 16 व 17 ऑगस्ट दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (16 ऑगस्ट) गावातून मुर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच पूजाविधी, होमहवन कार्यक्रम, रात्री भजन कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजता ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक काढून श्री राधाकृष्णमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर रामायणाचार्य ह.भ.प. नंदकिशोर खरात महाराज (श्रीक्षेत्र नेवासा) यांचे किर्तन होणार आहे. भाविकांसाठी यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ह.भ.प. काटे महाराज, भानुदास नवले महाराज, रामदास रक्ताटे महाराज, बालयोगी अमोल जाधव महाराज, अमोल सातपुते महाराज, मच्छिंद्र रोहकले, कैलास कोहक, सचिन पवार, योगेश शेजूळ, रविद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे व मकरंद हिंगे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी हिंगे परिवार, वाळुंज भजनी मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.