• Wed. Feb 5th, 2025

श्री क्षेत्र डोंगरगणच्या दिंडीत अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती

ByMirror

Jun 30, 2022

तर दिंडीतील वारकर्‍यांना प्राथमिक औषधोपचाराची किट भेट

फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र डोंगरगण रामेश्‍वर देवस्थान दिंडीचे बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. दिंडीतील वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी प्राथमिक औषधोपचाराची किट भेट देऊन अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती करण्यात आली. काही वारकर्‍यांनी मरणोत्तर अवयवदान व नेत्रदानाचा संकल्प केला.


ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री यांचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सत्कार करुन त्यांच्याकडे औषधाचे किट सुपुर्द केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, इंजि. साळुंके, विशाल गणपती देवस्थानचे अशोक कानडे, केमिस्ट असोसिएशनचे सागर फुलसौंदर, ह.भ.प. ढवळे महाराज, जिल्हा रुग्णालयाचे नेत्र समुपदेशक सतीश अहिरे, डॉ. सुहास वाळेकर आदींसह वारकरी उपस्थित होते.


प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्या रुग्णांसाठी 28 वर्षापासून शिबीर घेतले जात आहे. तर मागील 18 वर्षापासून वारकर्‍यांची सेवा सुरु आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान व नेत्रदानाबद्दल जनजागृती केली जात आहे. फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदान घडवून 1280 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळवून दिली असल्याचे सांगून त्यांनी नेत्रदान व अवयवदान करण्याचे आवाहन केले.


ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशन वारकर्‍यांसाठी देत असलेली आरोग्यसेवा कौतुकास्पद आहे. शहरात येणार्‍या इतर दिंडीतही त्यांची सेवा नित्यनियमाने सुरु असते. याचा फायदा अनेक वारकर्‍यांना होत असून, आरोग्य उत्तम राहून वारीचा खरा आनंद त्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर अवयवदान काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भगवान फुलसौंदर म्हणाले की, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड दिल्यास परिवर्तन घडणार आहे. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. भारतीय समाजात नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजूती व अंधश्रध्दा असून, त्या जनजागृतीने दूर होणार आहे. नेत्रदान व अवयनदान चळवळीत फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *