• Fri. Mar 14th, 2025

श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयाने दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jun 28, 2023

बाल वारकर्‍यांनी घडवले निसर्गरुपी विठ्ठलाचे दर्शन

विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात सावेडी उपनगरातून दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या बालवारकर्‍यांनी पर्यावरणातील हिरवाईने फुललेल्या विठ्ठलाचे दर्शन घडवून झाडे लावा… झाडे जगवा, पर्यावरण वाचवा… च्या घोषणा दिल्या. विविध भागातून मार्गक्रमण करताना दिंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना झाडांचे रोप देऊन वृक्षरोपण व संवर्धनाचे आवाहन करण्यात आले.


विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा…, माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल नामाच्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझिम व ढोल पथकासह दिंडी सोहळा रंगला होता. दिंडीत विद्यार्थी वारकरींच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस घेऊन सहभागी झाल्या होत्या.

भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकर्‍यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, जिजाऊ, श्रीकृष्ण, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.


संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करुन या सोहळ्याला प्रारंभ झाले. यावेळी सचिव डॉ. रत्ना बल्लाळ, विश्‍वस्त राजेंद्र म्याना, स्कूल कमिटीचे चेअरमन जयंत रंगा, नगरसेवक मनोज दुल्लम, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे सचिव शंकर येमूल, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. दिंडीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांनी लेझिमचे डाव सादर केले. दिंडीमध्ये रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी हातात घेतलेल्या फलकांद्वारे वृक्षरोपण, संवर्धनाचा व पर्यावरणातच विठ्ठल असल्याचा संदेश दिला.


श्रमिकनगरच्या बालाजी मंदिर समोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भिस्तबाग चौक, वैदूवाडी येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *