लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारुन प्रत्येक घरकुल वंचितांना भूमिगुंठा देण्याची मागणी
भूमीगुंठा राष्ट्रीय लढ्यात सहभागी होण्याचे घरकुल वंचितांना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघरांना घरांची स्वप्न दाखवून झुळवत ठेवणार्या सरकारला जाग आणण्यासाठी शिवजयंतीला पुन्हा राष्ट्रीय गीताभारत भूमिगुंठा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. रविवारी (दि.19 फेब्रुवारी) मुळा डॅम येथे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारकडे लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारुन प्रत्येक घरकुल वंचितांना भूमिगुंठा देण्याची मागणी केली जाणार आहे. तर या आंदोलनातील घरकुल वंचितांना मोफत अर्जाचे वाटप करुन भूमीगुंठा राष्ट्रीय लढ्यात सहभागी करुन घेतले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
2015 पासून बेघरांना घरे मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारने लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्वीकारली नसल्याने बेघरांना परवडतील अशा किमतीत घरे मिळाली नाहीत. त्याच वेळेला शहरी भागातील जागांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि लॅण्ड माफीयांच्या कोट्यावधी रुपये किंमतीच्या व सरकारी जमीनी अनेक वर्षापासून पड आहेत. सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने बेघरांना घरांचे स्वप्न दाखविले. अन स्वत: झोपी गेले. 2022 अखेर सर्वांना घरे देण्याची घोषणा फोळ ठरली. श्रीमंत अधिक श्रीमंत करण्यासाठी सत्तेचा वापर करण्यात आला, तर गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांनाच हटविण्यात आल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.
सरकारची कामगिरी तमस कौरव राज्यासारखी सुरू आहे. पांडवांना पाच गावे देखील देण्याची तयारी नसल्यामुळे गीताभारत घडले आणि महाभारताच्या युद्धात कौरव मारले गेले. शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणार्या पड जमिनीवर नागरी सुविधा पुरवून लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेखाली प्रत्येक कुटुंबाला एक भूमी गुंठा जमीन मिळाली पाहिजे. हा संघटनेचा सातत्याने आग्रह राहिला आहे. बेघरांना रेशनकार्डवर मोदी सरकार घरे देणार हा स्वत:चा भ्रम करुन घेतला. संघटित होऊन आंदोलन न केल्याने घरकुल वंचितांच्या आंदोलनाला सरकारने देखील प्रतिसाद दिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी घरकुल वंचितांना घरे देण्याच्या टिव्हीवरुन मोठ्या घोषणा करुन एकप्रकारे फसवणुक केली आहे. शहराच्या महापालिकेत 20 हजार बेघरांची यादी मंजूर आहे. गेल्या आठ वर्षात एकालाही घर मिळालेले नसल्याचे संघटनेने म्हंटले आहे.
प्रत्येक घरकुल वंचितांना भूमि गुंठा मिळण्याची मागणी संघटनेने सातत्याने केलेली आहे. जागा नसल्याने घर बांधणे शक्य होत नसून, जागेच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त हे आंदोलन जारी करण्यात आले आहे. मुळा डॅम येथे सकाळी 11 वाजता गेस्ट हाऊस येथे होणार्या या आंदोलनात सर्व घरकुल वंचितांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, डॉ. महेबूब सय्यद, अर्शद शेख, यमनाजी म्हस्के, कैलास पठारे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.
