स्थानिक पातळीवरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचे अधिकार्यांना सूचना
जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व संघटनाना सोबत घेऊन एल्गार पुकरणार -आमदार किशोर दराडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरात बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) घेतलेल्या शिक्षक दरबारमध्ये शिक्षक, शिक्षकेतरांनी विविध प्रश्न पोटतीडकीने मांडले. या बैठकीसाठी उपस्थित शिक्षण विभागातील अधिकारी यांना स्थानिक पातळीवरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सूचना आमदार दराडे यांनी केले. इतर प्रश्न मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन सोडविण्याचे व एससी बोर्ड अध्यक्ष व उपसंचालक यांच्या समवेत शालार्थ आयडीचा शिबिर लावणार असल्याचे आश्वासन दिले. तर जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व संघटनाना सोबत घेऊन एल्गार पुकरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या ग्रंथालयात झालेल्या या बैठकीसाठी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, दरेकर, वरिष्ठ लेखा परीक्षक दिपक प्रधान, वेतन अधीक्षका स्वाती हवेली, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, नगर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले, महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, रेसिडेन्शिअलचे प्राचार्य विजय पोकळे, छबुराव फुंदे, सुरेश मिसाळ, बाळासाहेब खेडकर, शिक्षक सेनेचे उध्दव सोनवणे, पारुनाथ ढोकळे, शिंदे सर आदी उपस्थित होते.
आमदार किशोर दराडे म्हणाले की, शिक्षक शालेय शैक्षणिक कामकाज, शासनाच्या नवनवीन धोरणांची अंमलबजावणी व शालाबाह्य कामांच्या दडपणाखाली व तणावात काम करत आहे. काही शिक्षकांना सेवासंरक्षण देखील नाही, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न गंभीर होत चालले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकार्यांनी त्यांना सहकार्याची भावना ठेवावी. शिक्षक दरबाराच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविणे हा प्रमुख उद्देश असून, कोणत्याही अधिकार्यांना त्रास देण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कायद्यात बसणार्या गोष्टींमध्ये त्रुटी काढून काही अधिकारी शिक्षकांना भयंकर त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांची परिस्थिती चांगली असल्यास भावी सुशिक्षित पिढी घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिक्षक दरबारसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर व विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिक्षक व शिक्षकेतरांनी शालार्थ आयडी, फरक बिले, वैयक्तिक मान्यता व डीएड टू बीएड मान्यता, निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, विनाअनुदानित-अनुदानित शिक्षकांच्या समस्या व शिक्षण विभागाशी निगडित विविध प्रश्न मांडली. यावर हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दराडे यांच्यासह शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षण उपसंचालक उकिर्डे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले.

आप्पासाहेब शिंदे यांनी बैठकीचे प्रोसिडींग मिळण्याची मागणी केली. विनाअनुदानित काम करणार्या शिक्षकांनी आई-वडिलांच्या उपचारासाठी पैसे नाहीत, वय होऊन गेले तरी लग्न नाही अशा विविध प्रश्न मांडले. बैठकीचे सूत्रसंचालन भाऊसाहेब रोहोकले यांनी केले. आभार वैभव सांगळे यांनी मानले.