कोहिनूर मंगल कार्यालयात थाटणार बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संलग्न जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्यच्या वतीने शहरात राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यामध्ये महिला बचत गटांचे विविध स्टॉल लावण्यात येणार आहे. तर विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक अॅड. महेश शिंदे यांनी दिली.
मागील दोन वर्ष कोरोनामुळे हा महोत्सव घेण्यात आला नव्हता, या वर्षी सावित्री ज्योती महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात रंगणार आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्य करणार्या स्वयंसेवी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे तज्ञ डॉक्टर्स व लोकजागृती करणारे साहित्यीक, कवी, पारंपारीक लोककला जोपासणारे लोककलावंत या समाजातील महत्वाच्या घटकांना एका स्वतंत्र मंचावर बोलावून विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध कला कौशल्य घेवून उद्योग व्यवसाय उभा करीत आहे. या गटांच्या उत्पादनाला वाव मिळण्यासाठी त्यांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. तर या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, कृषी, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. सेमी पैठणी साडी, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे गौरवाचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी दोन पासपोर्ट फोटो, आपल्या कार्याचा परिचय थोडक्यात अॅड. महेश शिंदे, पवन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टच्या पाठीमागे, टांगे गल्ली, अहमदनगर 414001 या पत्त्यावर 25 सप्टेंबर पूर्वी पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. तर स्टॉल लावण्यासाठी महिला बचत गटांनी 9921810096, 7744011011, 9004722330 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. सावित्री ज्योती महोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अॅड. प्रशांत साळुंके, पोपटराव बनकर, शिवाजी नवले, प्रा. सुनील मतकर, मेजर भीमराव उल्हारे, सचिन गुलदगड, सलीम सय्यद, संजय साळवे, रावसाहेब नगर, इसाबाई शेख, अमोल बागुल, बाळासाहेब पाटोळे आदी प्रयत्नशील आहेत.

