शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात 10 ते 15 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे व उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिमटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 10 जून रोजी गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता रोड नवनागापूर येथील श्री साई चैतन्य हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्रचिकित्सा, रक्तदाब व मधुमेह तपासणी, गरोदर माता समुपदेशन आणि आहार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर रोडच्या सुरभी हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. 14 जून रोजी नगर मनमाड रोड, सावेडी येथील गरुड कॅन्सर सेंटर येथे कॅन्सर तपासणी, मार्गदर्शन, शस्त्रक्रिया व केमोथेरपी केली जाणार आहे. या शिबिराचा समारोप 15 जून रोजी पाईपलाईन रोड, तुळजाभवानी मंदिर समोरील साई माऊली हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने होणार आहे.
या शिबिरात गुडघे प्रत्यारोपण, खुबे प्राप्त्यारोपण, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मधुमेह, कावीळ, यकृताचे आजार, हृदयविकार, उच्च रक्तदाब, दमा, फुफ्फुसांचे आजार, बालकांचे व महिलांचे आजार, थायरॉईड, किडनी, अस्थिरोग, टी.बी., दंतरोग आदी आजारा संबंधीत तपासण्या केल्या जाणार आहेत. गंभीर आजारावर शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व इतर शासकीय योजनांद्वारे मोफत किंवा माफक दरात करण्यात येणार आहेत. शिबिराला येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.