• Sat. Mar 15th, 2025

वाहतूक सुरक्षा दल व आर.एस.पी.च्या सहविचार सभेत रस्ता सुरक्षेवर चर्चा

ByMirror

Feb 4, 2023

मुलांना विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे नियमाचे धडे

शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस

अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा. यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबविण्यात यावे. महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस) व शिक्षण विभागाचे अधिकारातंर्गत प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण करण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले.


महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन (नागपूर) अहमदनगर विभागची (आर.एस.पी. अ‍ॅण्ड सी.डी.) सहविचार सभा शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कडूस बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक ए.बी. शिरसाठ, विभागीय आर.एस.पी. डिव्हिजनल कमांडर सिकंदर शेख, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी लाळगे, जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे शिक्षणाधिकारी कडूस यांनी आर.एस.पी. विषय शाळेमध्ये शालेय विद्यार्थी पर्यंत मर्यादित न राहता, ग्रामसभेतून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे काळाची गरज असल्याचेही सांगितले.


जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले यांनी पाहुण्यांची ओळख व स्वागत करून नोंदणी आणि शाळेतील उपक्रम विषयावर माहिती दिली. तर सर्व ग्रेड विषयांकरीता बालभारतीचेच पुस्तके वापरण्याचे आवाहन केले. सिकंदर शेख म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणाच्या माध्यमातुन विषयाचे गांभीर्य ओळखून विद्यार्थी जीवनात वाहतुक सुरक्षेचे महत्व, आपत्ती व्यवस्थापन, फायर फायटिंग, अग्निशमन, प्रथमोपचार, कॅरींग मेथड, परेड, शिस्त, प्रशिक्षणाचे कार्य आर.एस.पी. अ‍ॅण्ड सि.डी. संघटना कार्य करत आहे. भावी काळामध्ये होणारे रस्ते अपघाताचे प्रमाण कशाप्रकारे कमी होईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले.


मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे यांनी वॉक ऑन राईट उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करून, आर.एस.पी. शिक्षक-पोलीस व परिवहन विभागांनी एकत्रितपणे नियोजनातून उपक्रम राबविल्यास अपघाताच्या प्रमाणात घट होण्यास निश्‍चित मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी संगमनेर पंचायत समितितील जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाणे यांनी आर.एस.पी. अधिकारी शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. उपप्राचार्या भोसले मॅडम उपस्थित होत्या. सहा.पोलीस निरीक्षक ए.बी. शिरसाठ यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिले तर ते घरोघरी सर्व पालकांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचे स्पष्ट केले.


उपस्थित जिल्ह्यातील शिक्षकांनी मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत आर.एस.पी. चे प्रशिक्षण अहमदनगर जिल्ह्यातच घेण्यची मागणी केली. यावेळी सर्व तालुका समादेशक व जिल्ह्यातील आर.एस.पी. प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास कासार यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश डूबे यांनी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *