फरार असलेला सराईत गुन्हेगार विश्वजीत कासार व त्याच्या साथीदाराला अटक करण्याची मागणी
दहशतीखाली असलेल्या मयताच्या मुलाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथे नाथा ठकाराम लोखंडे खून प्रकरणातील फरार सराईत गुन्हेगार असलेला आरोपी विश्वजीत कासार व त्याच्या साथीदाराला त्वरीत अटक व्हावी, तसेच आरोपींकडून धमक्या मिळत असताना कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी मयताचा मुलगा तथा फिर्यादी अनुराज नाथा लोखंडे व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी (दि.4 मे) जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. तर दहा दिवसात सदर आरोपींना अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय समोर कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाळकी येथे कापड व्यावसायिक नाथा ठकाराम लोखंडे यांचा 30 एप्रिल रोजी सायंकाळी खंडणीसाठी मारहाणमध्ये मृत्यू झाला. यामध्ये इंद्रजीत कासार व शुभम उर्फ भोले भालसिंग यांनी 2 लाख 70 हजार रुपयांच्या खंडणीसाठी पोटात व छातीत जबर मारहाण केली होती. यामध्ये ते बेशुध्द होऊन मयत झाले. गावातील सराईत गुन्हेगार विश्वजीत कासार व अशोक उर्फ सोनू गुंड यांनी माझ्यासह भाऊ रवी व चुलते शिवाजी लोखंडे यांना फोनकरुन शिवीगाळ करुन सदरची खंडणी मागितली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला सराईत गुन्हेगार व मोक्काची कारवाई झालेला आरोपी इंद्रजीत कासार व विश्वजीत कासार बंधूसह शुभम उर्फ भोले भालसिंग, सोनू गुंड (सर्व रा. वाळकी) यांच्यावर खुनाचा व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी इंद्रजीत कासार व शुभम उर्फ भोले भालसिंग यांना अटक केली आहे. मात्र सराईत गुन्हेगार असलेला गुंड प्रवृत्तीचा आरोपी विश्वजीत कासार आणि सोनू गुंड फरार असून, यांच्यापासून संपूर्ण कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सदर आरोपी भाऊ रवी लोखंडे याला मेसेज, फोन करून व इतर व्यक्तींच्या मार्फत निरोप पाठवून सदर प्रकरण मिटविण्यासाठी धमक्या देत आहे. सदर आरोपीवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे असून, त्याची गावात मोठी दहशत आहे. रात्री-अपरात्री सदर आरोपी गावात येत आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली वावरत असल्याचे मयताचा मुलगा तथा फिर्यादी अनुराज लोखंडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
सदर आरोपींकडून कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, पोलीस प्रशासनाकडून कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे, फरार आरोपींना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताचा मुलगा अनुराज लोखंडे यांनी केले आहे.