दुसर्या पत्नीने वडिलांचा घातपात केल्याचा आरोप
विष पिण्यास प्रवृत्त केल्याचा किंवा विष देऊन मारण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्या पत्नीच्या जाचाला कंटाळून किंवा घातपात करुन अशोक कुंडलिक काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन सदर प्रकरणात अकास्मक मृत्यूची नोंद झाली असताना, या प्रकरणात मृत्यूची सखोल चौकशी करुन संबंधितांवर घातपात केल्याचा किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 302, 306 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
उपोषणात रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, मयत अशोक काळे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अभय काळे, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, आदिल शेख, पप्पू डोंगरे, संदीप वाघचौरे, मुन्ना भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.
अशोक काळे यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरा विवाह केला होता. त्यांना पहिल्या पत्नीकडून दोन मुले आहेत. शिरसगावला (ता. नेवासा) त्यांच्या मालकीची जमीन होती. त्यांची दुसरी पत्नी, पत्नीचा भाऊ आणि दाजी यांनी सदर जीमन विकण्यास त्यांना भाग पाडले.
सर्व पैसेही त्यांनीच वाटून घेतले व अशोक काळे यांना मारहाण करुन पिटाळून लावले. या वादानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. काळे यांचे महत्त्वाचे कागदपत्र देखील त्यांच्या दुसर्या पत्नीकडे होते. या कागदपत्रांची वारंवार मागणी करुनही न देता, दुसर्या पत्नीचा भाऊ व दाजी त्यांना मारहाण करुन हाकलून लावत होते. या मानसिक दडपणाखाली व त्रासाला कंटाळून त्यांनी 11 ऑक्टोंबर रोजी दुसर्या पत्नीच्या घरी विष घेतले. उपचारादरम्यान काळे 14 ऑक्टोंबरला मृत्युमुखी पडले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पहिल्या पत्नीचे दोन मुले असताना देखील त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांना दिली गेली नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी लपवण्याचे नेमके कारण समोर येण्याची गरज आहे. कोणताही व्यक्ती मोठे कारण असल्याशिवाय विष घेऊन आत्महत्या करू शकत नाही. कोणत्या त्रासाला कंटाळून त्यांनी विष घेतले?, त्यांना विष पिण्यास कोणी प्रवृत्त केले? किंवा त्यांना विष देऊन मारण्यात आले? याचा तपास करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु त्यांचा मुलगा अभय काळे व मुलगी अनिता काळे यांनी वडिलांचा घातपात करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. अशोक काळे यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करुन संबंधितांवर 302 अथवा 306 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपाईच्या वतीने उपोषण करण्यात आले. ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी याप्रकरणी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
