विद्यार्थ्यांनी लुटला मैदानी खेळांचा आनंद
खेळाने स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होते -अभिषेक कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्यातील क्षमता ओळखता येत नाही. खेळात यश, अपयश येत असतात मात्र खेळाडूवृत्तीने त्याचा सामना केल्यास स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होते. मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मैदानी खेळ खेळून शरीर व मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचे आवाहन माजी महापौर तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कळमकर बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले, दादासाहेब पांडूळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवाजी लंके यांनी क्रीडा स्पर्धेने मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. शिक्षणाबरोबर शारीरिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ तेवढेच महत्त्वाचे आहे. संस्थेचे अध्यक्ष ना. शरद पवार यांना खेळाची आवड असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले यांनी शिक्षणाबरोबर खेळ देखील आवश्यक आहे. खेळाणे शरीर सुदृढ राहून मन प्रसन्न राहते. खेळात देखील उत्तम करियर घडविता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक एस.एल. ठुबे म्हणाले की, बौद्धिक कौशल्याला शरीराची साथ मिळाल्यास यश मिळवता येते. जीवनात आरोग्य संपदा महत्त्वाची आहे. मैदानी खेळाणे आरोग्य संपदा विकसित होत असते. कोणत्याही स्पर्धेत अचानक न उतरता, त्यामध्ये यश मिळविण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. एखाद्या खेळात सातत्य असल्यास त्यामध्ये प्राविण्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या विविध मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाचा आनंद लुटला.

