• Sat. Mar 15th, 2025

रिपाई ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण

ByMirror

Mar 14, 2023

अपंगप्रमाणपत्राद्वारे पदोन्नती घेणार्‍या सर्व शिक्षकांची शारीरिक तपासणी करण्याची मागणी

खोटे अपंगत्व दाखवून अनेकांनी पदोन्नती घेतल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपंग प्रमाणपत्राद्वारे सन 2020 मध्ये पदोन्नती घेणार्‍या सर्व शिक्षकांची शारीरिक तपासणी व प्रत्यक्ष अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारीची चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण करण्यात आले.


रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, ज्योतीताई पवार, आदिल शेख, नईम शेख आदी सहभागी झाले होते.


रिपाई ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला 2020 च्या अपंग पदोन्नतीची शारीरिक तपासणी करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. सदर पदोन्नती घेतलेले काही व्यक्ती हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असून, त्यांनी खोटे अपंगत्व दाखवून दिव्यांगांच्या योजनांचा फायदा घेतलेला आहे. जिल्हा परिषदेत दाखल केलेले प्रमाणपत्र प्रत्यक्षातील व्यक्तींमध्ये तफावत असून, काहींनी अधिकची टक्केवारी दाखवलेली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने 39 व्यक्तींपैकी 29 व्यक्तींचे प्रमाणपत्र तपासण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात लाभार्थींची शारीरिक तपासणीची मागणी रिपाई ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील चौकशी होत नसल्याने, जाणून-बुजून हे प्रकरण दडपण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. या प्रकरणात खर्‍या दिव्यांगावर अन्याय झाला असून, शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तींनी पदोन्नतीचा लाभ घेऊन शासनाची मोठी फसवणूक झालेली आहे. तर यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाआहे. याप्रकरणात सर्वांची शारीरिक तपासणी केल्यास खरे व खोट्यांचा पर्दाफाश होणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *