• Thu. Mar 13th, 2025

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा

ByMirror

Apr 3, 2023

रक्तदान करुन जोपासली सामाजिक बांधिलकी

महिलांना प्रेशर कुकरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा शहरात महिला मेळावा पार पडला. यामध्ये अंधांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. तर अंध महिलांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. अजिंक्य आंम्ही… सक्षम आम्ही! या गीतांनी सुरु झालेल्या कार्यक्रमातून अंधांनी सक्षमतेचा संदेश दिला. तर यावेळी दृष्टिहीन असलेल्या व त्यांच्या कुटुंबातील महिलांना प्रेशर कुकरचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सविता काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी दामिनी सातपुते, शिवसेनेचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते, महापालिकेच्या डॉ. सौ. सुरवडकर, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्याच्या मानस अध्यक्षा कविता पेंढारे, कार्यकारणी सदस्या अरुणाताई बोडखे, राज्याचे सचिव प्रदीप लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोरख दरंदले, जिल्हा शाखेचे अध्यक्ष नितीन सोनार, मानस अध्यक्ष संभाजी भोर, महासचिव श्रीकांत माचवे, कोषाध्यक्ष कौस्तुभ पराई, उपाध्यक्ष किशोर हाडोळे, उद्योजक विश्‍वनाथ पोंदे, अ‍ॅड. शैलेंद्र गांधी, ईश्‍वर सुराणा, अजित चाबुकस्वार, डॉ. विनोद सोळंके, डॉ. प्रवीण रानडे, शिवसेना उपप्रमुख प्रवीण सप्रे, मेजर नीलकंठ उल्हारे, नितीन खंडारे, सचिन उरमुडे, शीतल उरमुडे, सुरेखा उरमुडे, ज्योती तवले, सुंदर फलके आदींसह जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधव, महिला व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


भाग्यश्री माचवे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय दृष्टिहीन संघ अंधांनी अंधांसाठी चालवलेली संस्था आहे. अंधांना आधार देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व अंध एकवटले असून, अंधांसाठी सामाजिक चळवळ सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिलीप सातपुते म्हणाले की, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने सातत्याने अंध बांधवांना आधार देण्याचे काम केले. कोरोना काळात मदत जमा करुन गरजू अंधांना त्यांनी घरपोच मदत उपलब्ध करुन दिली. अंधांसाठी मोठ्या तळमळीने कार्य सुरू असून, दिव्यांगांची सामाजिक चळवळ प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. तर या संस्थेसाठी शहरात कार्यालय उपलब्ध नसल्याने पॉलिटेक्निक महाविद्यालय येथील शिवसेनेचे कार्यालय त्यांना कामकाजासाठी खुले असल्याचे आश्‍वासन देऊन तेथून कार्य करण्याचे सांगितले.


महापालिकेच्या डॉ. सुरवडकर यांनी महिलांचे आरोग्य कुटुंबाच्या आरोग्याचा पाया आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिलांनी आहार व व्यायामाकडे लक्ष देऊन इंद्रधनुष्याप्रमाणे आहारात सर्व फळ-पाले भाज्यांचा समावेश करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सविता काळे म्हणाल्या की, अंध व्यक्ती सक्षम झाल्यास त्यांचे पुनर्वसन होऊन कुटुंब समृध्द होणार आहे. त्यांना मदतीपेक्षा सक्षम करण्यासाठी संस्थेचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक आहे. अंधांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


या मेळाव्यात विविध क्षेत्रात यश प्राप्त करणारे व पुरस्कार मिळविणार्‍या अंध बांधवांचा गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरासाठी महापालिका रक्त केंद्राचे सहकार्य लाभले. तर अंध महिलांची आरोग्य तपासणी स्नेह 75 ग्रुपच्या वतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा ठाकूर यांनी केले. आभार सुंदर फलके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *