महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान -आरती शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान! जबाबदारीसह घेते भरारी, नाव तीचे नारी… याप्रमाणे प्रत्येक महिलांना समाजात सन्मान दिला गेला पाहिजे. तरच आपले कुटुंब, समाज व गाव सक्षम व सुदृढ होणार असल्याचे प्रतिपादन उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
रतडगाव (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (देवगाव), नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडान फाउंडेशन व रतडगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होत्या. ग्रामपंचायत येथे सरपंच शारदा वाघुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जि.प. शाळेचे मुख्याध्यापिका सुमन पानसंबळ, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पालवे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी मोरे, जय असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, भारती शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सुमन पानसंबळ यांनी स्वच्छता ही सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. महिलांनी पुढाकार घेऊन वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आपला परिसर व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पालवे म्हणाले की, महिला जन्मजात सक्षम आहे. फक्त त्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. शिक्षणाने आज खर्या अर्थाने क्रांती केलेली असून, महिला सर्वच क्षेत्रातील पदावर आज विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड. महेश शिंदे म्हणाले की, महिलांच्या सन्मानासाठी व न्याय-हक्कासाठी जगभरात महिला दिन साजरा होतो. वर्षभर महिलांचा सन्मान केल्यास कौटुंबिक कलह संपुष्टात येतील. प्रत्येक स्त्री आपले आयुष्य कुटुंबासाठी समर्पित करते, तिचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सरपंच शारदा वाघुले यांनी प्रत्येक महिला माहेर आणि सासर दोन्ही कुटुंब प्रकाशमान करण्याचे काम करते. घराचे घरपण जपण्यासाठी ती जगत असते. कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलवून आपले कर्तृत्व देखील सिध्द करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व वृक्षाला पाणी अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी महिलांची हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब व इतर तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थ, महिला, बचत गटातील महिला व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता राऊत, दीपा टोणे, संगीता दुसुंगे, अंगणवाडी सेविका शकुंतला वाघुले, कल्पना बनसोडे, सिंधू वाघुले, पल्लवी मोहिते, उज्वला तळेकर, भारती शिंदे, अत्तार सय्यद, कल्पना बनसोडे, मनीषा सादे, पूजा सुरजे, सुचित्रा बनसोडे, भारतीय बनसोडे, गीता बनसोडे, वैष्णवी मोहिते, ऐश्वर्या बनसोडे, तनुष्का बनसोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, विशाल गर्जे, पोपट बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
