अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
ऑनलाईन जुगार युवकांचे नैराश्य, व्यसन व आत्महत्येला कारणीभूत
अहमदनगर (प्रतिनिधी)- पब्जी, रम्मी व इतर ऑनलाईन जुगाराने युवा पिढी उध्वस्त होत असताना, त्यावर त्वरित बंदी आणण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व अमोल खरमाळे यांनी पाठविले आहे.
महाराष्ट्रसह देशात सुरू असणारे पब्जी, रम्मी सारख्या ऑनलाईन जुगार खेळ तरुण पिढीसाठी घातक ठरत आहे. यामुळे युवा पिढी बर्बाद होत असून, अनेकांचे प्रपंच उध्वस्त होत आहे. जुगाराने आर्थिक नुकसान झाल्यास युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. तर नैराश्यातून आत्महत्या देखील करत आहे. केंद्र व राज्य सरकारने ऑनलाईन जुगारी खेळांवर बंदी आणून तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
विधानसभेत हा तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी देखील समितीच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली आहे. हा अत्यंत जिव्हाळ्याचा व ज्वलंत प्रश्न असून, देशातील तरुणाई ऑनलाइन जुगाराच्या आहारी जावून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. ज्याप्रमाणे चायनाचे संपूर्ण अॅप बंद केले, त्याचप्रमाणे या ऑनलाईन जुगारचे अॅपवर बंदी आणावी. महाराष्ट्रसह संपूर्ण देशात ऑनलाइन जुगाराला बंदी आणण्यासाठी पावले उचलण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.