भाषणातून शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास उभा करुन विद्यार्थ्यांनी केला जय जयकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उमर खोकर, प्राचार्य हारून खान, उपप्राचार्या फराना शेख आदींसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करुन त्यांचे गड, किल्ले माहिती देऊन महाराजांचा ज्वाजल्य इतिहास उभा केला. तर राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा… चे गायन करुन विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जय जयकार करुन अभिवादन केले. रामेश्वर हारके यांनी राज्यगीताची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्राचार्य हारून खान म्हणाले की, शिवाजी महाराजांचा लढा मुस्लिम विरोधी नव्हे, तर मुघल साम्राज्याविरोधात होता. त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी जात, धर्म, पंथाचा भेदाभेद न करता आदर्श राज्य निर्माण केले. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदारांवर महत्त्वाची जबाबदारी होती. समाजातील जातीय द्वेष संपविण्यासाठी महाराजांचा खरा इतिहास सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

अब्दुल रहीम खोकर यांनी आज देशात जातीयवाद फोफावत असून, पुन्हा शिवाजी महाराजां सारख्या राजाची रयतेला गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख व राजश्री गायकवाड यांनी केले.
