स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल शाळेकडून सत्कार
मार्कंडेय शाळेतून जीवनाला दिशा मिळाली -गणेश कवडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्कंडेय विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश कवडे यांची महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांनी कवडे यांचा सत्कार केला. यावेळी सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त राजू म्याना, महेंद्र बिज्जा, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, प्रा. बत्तिन पोट्यन्ना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, ग्रंथपाल विष्णू रंगा आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, विद्यालयाचे माजी विद्यार्थी उच्च पदावर जात असल्याचा विद्यालय व शिक्षकांना अभिमान आहे. गुरुचे श्रेष्ठत्व शिष्याच्या कर्तृत्वाने सिध्द होत असते. गुरुंनी घडवलेले संस्कार व शिक्षणाच्या शिदोरीने विद्यार्थी आपले भवितव्य घडवित आहे. कवडे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी झालेली निवड शाळेच्या दृष्टीने भूषणावह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना गणेश कवडे म्हणाले की, मार्कंडेय शाळेतून जीवनाला दिशा मिळाली. नेतृत्व क्षमता व विविध कला-गुणांचा विकास साधला गेला. शालेय शिक्षकांमुळे जीवनात उभे राहू शकलो, असल्याची भावना व्यक्त करुन शिकलेल्या शाळेत गुरुजनांकडून सन्मान होणे ही जीवनात सर्वात आनंदाचे क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राजू म्याना यांनी मार्कंडेय शाळेत अनेक सर्वसामान्य कुटुंबातील माजी विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत गेले आहेत. कवडे हे देखील मागील पंधरा वर्षापासून नगरसेवक असून, स्थायी समितीच्या सभापतीपदी झालेली निवड शाळेसाठी अभिमानास्पद आहे. जिद्द व चिकाटीच्या शिक्षणाचे बाळकडू शाळेतच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू रंगा यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रमोद चन्ना यांनी मानले.