एकवीसाव्या शतकातील महिलांनी सजग व जागृक होण्याची गरज -डॉ. प्रियंका मिटके
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकवीसाव्या शतकातील महिलांनी सर्वच गोष्टींबाबत सजग व जागृक होण्याची गरज आहे. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आरोग्याबाबत जागृक तर अन्याय, अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी जागृक राहिले पाहिजे. आजची महिला अबला नसून, सशक्त आहे. पुरुष हा नेहमी कॉमन मॅन असतो, कारण महिला ही सुपर वुमन असते, असे प्रतिपादन डॉ. प्रियंका मिटके यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहमदनगर प्राईड व वधवा केअर अॅण्ड क्युअर क्लिनिकच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. मिटके बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून छाया राजपूत, डॉ. मीरा बडवे, लायन्स क्लब प्राईडचे मनयोगसिंह माखिजा, अभिजीत भळगट, प्रिती शहा, भावना लांडगे, प्रिया बोरा, मंगला मूनोत, प्रणिता भंडारी आदी उपस्थित होत्या.
शिबीराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. सिमरन वधवा यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा-मुलगी मध्ये समानता निर्माण होण्याची गरज आहे. मुलगी झाल्यावर मुलगा झाल्याप्रमाणेच आनंद झाला पाहिजे. महिलांनी एकमेकींमध्ये गैरसमज न पसरविता आरोग्याबाबत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळोवेळी तपासण्या करण्याचे सांगितले.
छाया राजपूत म्हणाल्या की, सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेतबानी त्याच बरोबर कुटुंब सांभाळून महिला आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. यासाठी महिलांनी मोठा संघर्ष करून आपले अस्तित्व निर्माण करावे लागते. महिलांचा समाजात सन्मान राखून त्यांना प्रेरणा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रामचंद्र खुंट येथील वधवा केअर अॅण्ड क्युअर क्लिनिक मध्ये झालेल्या या शिबीरात महिलांची हिमोग्लोबीन व इतर चाचण्या करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी हरजितसिंह वधवा, दिलीप कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोरा यांनी केले. आभार डॉ. प्रिया मुनोत यांनी मानले.