युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे युवकांना उद्योग विश्वात दिशा देण्याचे कार्य सुरु -जितेंद्र तोरणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला जिल्हाभरातील युवक-युवती उपस्थित होत्या.
या कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय ठेकेदार जितेंद्र तोरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी वास्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव, ई टेंडरचे मास्टर ट्रेनर हर्षद बर्गे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे आदींसह प्रशिक्षणार्थी युवक उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे म्हणाले की, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग विभागाच्या आधिपत्याखालील कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून, या कार्यालयामार्फत उद्योग वाढीसाठी नाविन्य पूर्ण विविध प्रशिक्षण राबविण्यात येतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून युवक-युवतींना ई टेंडरिंगची माहिती होवून अनेक शासकीय व इतर संस्थेचे कामे घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र तोरणे म्हणाले की, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे युवकांना उद्योग विश्वात दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. अनेक युवकांनी प्रशिक्षण घेऊन आपले उद्योग व व्यवसाय उभे केले असून, आर्थिक संपन्नतेसाठी व समाजाच्या विकासासाठी युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ई टेंडरचे मास्टर ट्रेनर हर्षद बर्गे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ठेकेदार बनावे, या क्षेत्रात खूप मोठ्याप्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर ई-निविदा प्रक्रिया ओळख, ई-निविदा प्रक्रिया पद्धती, शासनाचे ई-टेंडरिंग बाबत मार्गदर्शक तत्त्वे, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज कसा करावा, पीएसयू, सीपीएसयू आणि सरकारच्या आवश्यकतांचे मूल्यांकन कसे करावयाचे, कंपनी नोंदणी प्रक्रिया, ई-निविदा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि दस्तऐवजीकरणाचा लाइव्ह प्रात्याशिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जेम पोर्टल, पोर्टलवर फर्म नोंदणी करणे, जीएसटी आणि त्याचा परिचय, जीएसटी नोंदणी प्रक्रिया, एमएसएमई ग्लोबल मार्ट व नव उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना व त्यांची अंबलबजावणी बाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षणार्थी युवक-युवतींच्या विविध प्रश्नांचे उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.