न डगमगता हालअपेष्टा सहन करुन महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळीने क्रांती झाली. यामुळे समाज सुशिक्षित होवून प्रगती झाली. न डगमगता हालअपेष्टा सहन करुन त्यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली व महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. या क्रांतिकारक विचाराची सातत्याने प्रेरणा मिळण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याचे कार्य सुरु असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बजरंग भुतारे, विष्णू म्हस्के, ओबीसी सेलचे अमित खामकर, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंंजि. केतन क्षीरसागर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, प्रा. भगवान काटे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक कैलास खरपुडे, डॉ. रणजीत सत्रे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, अमोल कांडेकर, रेणुका पुंड, सोनाली सोनसळे, रामदास फुले, लहू कराळे, आनंद पुंड, मळू गाडळकर, निलेश हिंगे, सोमनाथ गाडळकर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, येणार्या काळात माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्ण कृती पुतळा उभारून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर त्याचे नियोजन सुरु आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून फुले दांम्पत्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा मिळणार असून, त्यांचे विचार आजही सर्व समाजासाठी दीपस्तंभा प्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा फुले यांनी दीनदुबळ्यांना आधार देऊन त्यांच्या उध्दारासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र सर्वसामान्यांना दिले. शिक्षणाचा पाया रोवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज सुसंस्कारी केला. महिलांपासून शिक्षणाची सुरुवात करून, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडविल्याचे त्यांनी सांगितले.