• Sat. Mar 15th, 2025

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे सोमवारी पुणे समाजकल्याण आयुक्तालय समोर उपोषण

ByMirror

Feb 22, 2023

पिडीत कर्मचारी व शिक्षक होणार सहभागी

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या वतीने सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.27 फेब्रुवारी) पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालय समोर उपोषण करण्यात येणार असून, न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण सुरु राहणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिली.


संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, राज्य प्रमुख सल्लागार अ‍ॅड. अरविंद अंबेटकर, राज्य प्रदेशाध्यक्ष कैलासराव सातपुते, राज्य सरचिटणीस अंबादास शिंदे व राज्य पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपोषणात संस्थेतील पिडीत सर्व कर्मचारी व शिक्षक सहभागी होणार आहेत.


सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानने केलेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, आज अखेर कर्मचार्‍यांना न देण्यात आलेल्या मानधनाची, संस्थेच्या बँक खात्यातून संचालक मंडळ सदस्यांच्या वैयक्तिक खात्यावर घेतलेल्या रकमेची (पर्सनल प्रॉपर्टी), संस्थेच्या बँक खात्यावरुन सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय येथील दोन अधिकार्यांच्या खात्यावर गेलेल्या लाखो रुपयांची, बोगस दाखल केलेल्या ऑडिटची सखोल चौकशी करून सत्य सरकार समोर आणण्याची मागणी संघटनेने केली आहे.


तसेच 2019 नंतर संस्थेत केंद्र शासनाचे अनुदान मिळण्यासाठी जास्त विद्यार्थी पट, बोगस शिक्षकांची नावे, मयत कर्मचारी अनिल शंकर कांबळे यांचे नाव मानधन दिल्याचे दाखवत साखळी पद्धतीने संचालक मंडळाचा अनुदान मिळाल्यास व मिळण्यास मदत करणार्‍या व शासन निर्णयाची पायमल्ली करणार्‍या संबंधित सर्व समाज कल्याण अधिकार्‍यांची सक्षम त्रयस्त यंत्रणेकडून निपक्ष पारदर्शक चौकशी होऊन कारवाई करावी व भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करून आश्रम शाळेवर त्वरित प्रशासकाची नेमणूक करावी, संस्था चालकाद्वारे सद्गुरु रोहिदास अनुसूचित जाती केंद्रीय आश्रम शाळा खांडगाव (ता. पाथर्डी) या आश्रमशाळेवर येण्यास मज्जाव केलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेऊन त्यांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा करावे, 17 महिन्या पासून प्रलंबित असलेली संबंधित चौकशी समिती नाशिक यांच्यावर दप्तर दिरंगाई कारवाई करण्यात यावी, संस्थेचे सरकारी ऑडिट करण्यात यावे, पीडित शिक्षक कर्मचार्‍यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *