• Thu. Mar 13th, 2025

भाळवणीसह इतर दुष्काळी गावांना पिंपळगाव जोगा धरणातून सिंचनसाठी पाणी मिळावे

ByMirror

May 7, 2023

भाजप कामगार आघाडीचे पालकमंत्री विखे यांना निवेदन

या प्रश्‍नी स्थानिक शेतकर्‍यांसह कृती समिती स्थापन करणार -रघुनाथ आंबेडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव जोगा (ता. पारनेर) धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार उपसा सिंचन योजनेद्वारे दुष्काळी भाग असलेल्या भाळवणी व इतर परीसरातील गावांना सिंचनसाठी पाणी मिळण्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजप कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आली. कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी राज्य सरचिटणीस अरुण मुंढे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी, पारनेर तालुकाध्यक्ष सुनील थोरात, राहुल शिंदे, डॉ. अभिजीत रोहोकले आदी उपस्थित होते.


पारनेर तालुक्यातील भाळवणी, विरोली, कान्हूर पठार, गोरेगाव, जामगाव, वडगाव आमली, भांडगाव, किन्ही, करंदी, निमगाव घाणा आदी गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असून सदर गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. आजही काही गावांना शासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. ही पिढ्यानपिढ्या दुष्काळी परिस्थिती सुरू आहे. टँकरवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च होत आहे. सदर पठारी भागातील जमिनी आजही काळ्याभोर कसदार व सुपीक आहेत. पण आज पाण्याअभावी कोरडवाहू झाल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पारनेर तालुक्यात सक्षम नेतृत्व नसल्याने पठारी भागातील शेतकर्‍यांना अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप भाजप कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. या भागात कान्हूर पठार उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाल्यास दुष्काळी परिस्थिती हटून शेतकर्‍यांचे कल्याण होणार आहे. या भागातील मोठ्या शहरात रोजगारासाठी जाणारे तरुण वर्ग शेतीकडे वळतील व गावाचा विकास साधला जाणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

भाळवणी व इतर परीसरातील दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनसाठी पाणी मिळण्याची मागणी भाजप कामगार आघाडीच्या वतीने पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. पालकमंत्री विखे यांनी याबाबत संबंधित विभागाला सर्व्हेक्षणाचे सूचना केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

भाळवणीसह इतर दुष्काळी गावांचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. कसदार शेती असूनही पाणी नसल्याने शेतकर्‍यांना पिके घेता येत नाही. पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळाल्यास हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. या मागणीसाठी स्थानिक शेतकर्‍यांसह कृती समिती स्थापन केली जाणार आहे. तर राज्यात असलेल्या शिवसेना-भाजप सरकारकडे पाठपुरावा करुन शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविला जाणार आहे. -रघुनाथ आंबेडकर (तालुकाध्यक्ष, भाजप कामगार आघाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *