विविध भागातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीचा उदय -रावसाहेब काळे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देऊन, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीचा उदय झाला आहे. सत्ताधारी व विरोधक स्वत:चे हिता साधत असल्याने त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तर पिढ्यानपिढ्या चालत असलेली घराणेशाहीला पर्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करणार्यांना संधी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी केले.

भारतीय लोकशाही पार्टीच्या राज्य पदाधिकार्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी अध्यक्षीय भाषणात काळे पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पोपट बनकर, राष्ट्रीय सचिव सुभाष आल्हाट, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय पाथरे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या मनीषा कासार, ईसाभाई शेख, सागर आलचेट्टी आदी उपस्थित होते.
पुढे काळे पाटील म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितच चांगली संधी भारतीय लोकशाही पार्टीत मिळणार आहे. समाजकारणातून राजकारण करून कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे त्यांनी आवाहन केले.

या बैठकित पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्षपदी भटक्या नंदीवाले समाजाचे बाबू काकडे, जिल्हाध्यक्षपदी राम कराळे, अनुसूचित जाती-जमातीच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद साळवे, सैनिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मेजर अशोक गोरे, शहराध्यक्षपदी मेजर कैलास येवले, महिला आघाडी जिल्हा सचिवपदी रूपाली पुंड, शहराध्यक्षपदी अंजली पाडळे, आरोग्य आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ज्योती आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय सचिव सुभाष आल्हाट यांनी कार्यकर्त्यांनी तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून समाजातील समस्या सोडविल्या तरच समाज पक्षाला जोडला जाणार आहे. पक्ष संघटन, नेतृत्व कौशल्य हे घटक पार्टीसाठी अत्यावश्यक असून सद्यस्थितीतील गढूळ राजकारण हे विकासासाठी घातक आहे. सदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान व कर्तव्य पार पाडण्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय पाथरे म्हणाले की, समाज संघटित करून जागृत करण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी हाती घेतले पाहिजे. ठराविक घटकांची मक्तेदारी घराणेशाही मोडीत काढून, सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भारतीय लोकशाही पार्टीची ओळख संपूर्ण देशात होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुभाष जाधव, देविदास पवार, बाबासाहेब गोरे, दीपक वर्मा, संतोष कराळे, दत्तात्रय वामन, शाहीर कान्हू सुंबे, सुनंदा साबळे, कारभारी वाजे, किशोर शेरकर, प्रकाश खेडे, मेजर संजू ढाकणे, विजया ढाकणे, अण्णासाहेब पाटोळे, मेजर शिवाजी वेताळ आदींसह पुणे, बीड, नगर, भिंगार, बोल्हेगाव, राहुरी, जेऊर, आगडगाव, वाळकी, नेवासा, इमामपुर, केडगाव आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी भारतीय लोकशाही पार्टी प्रवेश केला.