• Sat. Mar 15th, 2025

बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या ताकद उद्योजकतेची कार्यक्रमास तरुणाईची अलोट गर्दी

ByMirror

Jul 5, 2023

शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या उद्योजकांनी उलगडले आपल्या यशाचे रहस्य

उद्योग व व्यवसायात हिम्मतीला किंमत -गणेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कष्टाला दिशा असली तर यश मिळणार. फक्त कष्ट करून उपयोग नाही. उदरनिर्वाह म्हणजे करियर नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, आपल्याला आपले नाणे वाजवून विकता आले पाहिजे. नोकरीपेक्षा मुलांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकतेचे विचार पालकांनी रुजवावे. उद्योग व व्यवसायात हिम्मतीला किंमत आहे. बाजारात हिम्मतीशिवाय सर्वकाही विकत मिळते. नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार करा, काळ व वेळेनुसार बदला, स्वत:मधील क्षमता, आवड ओळखण्याचे आवाहन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.


युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने शहरात बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने ताकद उद्योजकतेची या विषयावर निशुल्क व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सावेडीच्या माऊली सभागृहात झालेल्या या व्याख्यानात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी दुग्ध व्यवसायिक तथा कृषी उद्योजिका श्रद्धा ढोरजे-ढवण, उद्योजक पै. शिवाजी चव्हाण, व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे, रोहित कोडम, सुदाम मेहेत्रे, बीइंग सोशलचे धनंजय मेहेत्रे, सचिन जगताप, सुरज वाकळे, केशव नागरगोजे, प्रभाकर गवांदे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, परीक्षेतील मार्कांपलीकडे जाऊन शिक्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. मार्कची पिढी पुढे येत असल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. कोणत्याही उत्पादनांची ट्रेड येत नाही, तो आणावा लागतो. आपले उत्पादन ग्राहकांवर लादण्यासाठी मार्केटिंग स्किल देखील महत्त्वाची ठरते. आपल्यातील आवड, निवड व करियर यामधील गलत करता कामा नये. आपला रस्ता ओळखा, एखाद्याला मागे टाकण्याच्या नादात स्वत:चे ध्येय विसरू नका. जगण्याची धमाल करा, लोकांची गरज ओळखून उद्योजक, व्यावसायिक होण्याचे त्यांनी सांगितले. तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना आलेल्या अडी-अडचणीचे दाखले देत, त्यांचा आदर्श समोर ठेऊन उद्योग विश्‍वात आपले स्थान निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले.


दुग्ध व्यवसायिक तथा कृषी उद्योजिका श्रद्धा ढोरजे ढवण हिने निघोज (ता. पारनेर) येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुचाकीवर घरोघरी दूध घालण्यापासून ते उभा केलेल्या अद्यावत गोठा व त्यातून मिळणारे लाखोचे उत्पन्नाची आपली यशस्वी वाटचाल विशद केली. अपंग वडील, लहान भाऊ व आर्थिक परिस्थितीला तोंड देत मोठ्या जिद्दीने उभे केलेले कृषी क्षेत्रातील यशस्वी विश्‍वाची वाट तिने उलगडून दाखवली. तर आपल्या कामाची लाज न बाळगता, त्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संदेश तिने तरुणाईला दिला.


प्रास्ताविकात धनंजय मेहेत्रे यांनी शहरातून युवा उद्योजक व व्यावसायिक घडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रतिसाद पाहून यापुढे देखील या प्रकारचे कार्यक्रम घेऊन युवकांना दिशा देण्याचे काम बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पैलवान व उद्योग विश्‍वात वेगळा ठसा निर्माण करणारे पै. शिवाजी चव्हाण यांनी प्रारंभी उदरनिर्वाहासाठी केलेले तारेचे वॉल कंपाऊंडचे काम, पुढे भाजी व्यवसाय, रसवंतीगृह चालवून शहरात एका मालमत्ता खरेदी विक्रीच्या कार्यालयात झाडू-पुसण्याचे काम करताना याच क्षेत्रात निर्माण केलेले असतित्वाचा प्रेरणादायी प्रवास विशद केला. जिद्द, चिकाटी, मनात धरली तर कोणतीही गोष्ट शक्य नाही. आपल्या व्यवसायावर विश्‍वास ठेवा फळ नक्की मिळते. मात्र व्यवसायाशी प्रामाणिक रहाण्याचे त्यांनी सांगितले.
व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी एकेकाळी व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज मिळाले नाही. मात्रा 600 कोटींच्या ठेवी असून, अनेकांना कर्ज दिले जात असल्याचे स्पष्ट केले. लोकांचे भले करण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन असावा. उद्योगात भांडवल व शिक्षणापेक्षा धाडस महत्त्वाचे ठरते. उद्योगाचे स्किल आत्मसात करून संघर्षाने ध्येयप्राप्ती करण्याचे त्यांनी सांगितले.


उद्योजक शरद तांदळे यांनी ऑनलाइन युवक युवतींशी संवाद साधला. यावेळी अनेक शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या उद्योजकांची यशोगाथा ऐकून प्रफुल्लीत झालेल्या युवक-युवतींनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. या कार्यक्रमास महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खचाखच भरलेल्या सभागृहात बसण्यासाठी जागा नसल्याने शेवटी उभे राहून तर काहींनी खाली मांडी घालून हा प्रेरणादायी कार्यक्रम अनुभवला.


तांदळे म्हणाले की, सोशल मीडियातील चमक-धमक व स्पर्धा पाहून युवकांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. युवकांनी इतरांचे ऐकून करिअर निवडू नये. मोठी स्वप्न पहाणे, ही यशाची पहिली पायरी आहे. क्षमतेनुसार स्वप्न पाहून ते पूर्ण करा. स्वतःमधील कौशल्य वाढवा. चांगल्या लोकांशी संवाद साधा, चांगले पुस्तके वाचा व नवीन गोष्टी शिकण्याचा त्यांनी सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर विश्‍वकर्मा, प्रणाली बावलेकर, अक्षय तोडमल यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *