परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहिजे -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर व बिकट आर्थिक परिस्थितीत विविध ठिकाणी काम करुन शिक्षण पूर्ण करणारा प्रथमेश वसंत वाळुंज हा युवक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. नुकतीच त्याची आसाम रायफलमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा एकता फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा निमगाव वाघा सोसायटीचे संचालक अतुल फलके, फिरोज सय्यद, विकास वायळ, राजू फलके, विनोद लठाड, दिगंबर निवाळकर, प्रदीप कराळे,अविनाश पावडे, दिपक गायकवाड, संचित बुलाखे आदी उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहिजे. परिस्थितीने खचून न जाता प्रथमेशने यश संपादन केले आहे. बिकट परिस्थितीवर मात करुन त्याने मिळवलेले यश मोठे आहे. शिक्षणाच्या वयात त्याने सायकलीवरून प्रवास करुन व कामकरुन मिळवलेल्या अर्थाजनाने शिक्षण घेतले व यश संपादन केले. असे युवक समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत मुळ गाव असलेल्या प्रथमेश वसंत वाळुंज याने दहावीपर्यंतचे शिक्षण राहत्या गावात, तर उच्च माध्यमिकचे शिक्षण श्रीगोंदा येथे पूर्ण केले. शहरात विविध ठिकाणी काम करुन न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात त्याने एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. नुकतेच झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत त्याने यश संपादन केले. त्याला न्यू आर्टस महाविद्यालयाचे मा.उपप्राचार्य रोहिदास कोल्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
