कांशीराम यांच्या कार्याला शाहिरी गीतांमधून उजाळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कांशीराम अमर रहे!… च्या घोषणा देण्यात आल्या. तर आंबेडकरी विचारातून समाजाला दिशा देणारे कांशीराम यांच्या कार्याला शाहिरी गीतांमधून उजाळा देण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमासाठी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, शहर महासचिव नंदू भिंगारदिवे, शहर कोषाध्यक्ष दीपक पवार, शहर सचिव राजू गुजर, ज्येष्ठ नेते संजय डहाणे, उमाशंकर यादव, राजू शिंदे, गणेश बागल, मनोज साठे, बंडू पाटोळे, विजय मिसाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की, कांशीराम यांनी बहुजन समाज संघटित करुन सत्ता मिळवली. बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केले. देशात जातीयवादी सरकार सत्तेत असून, बहुजन समाज व शेतकरी वर्गावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. कांशीराम यांच्या विचाराने बहुजन समाज जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय डहाणे यांनी समाजाला कांशीराम विचारांची गरज असून, त्यांचे विचार घेऊन बसपा बहन मायावतींच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. कांशीराम यांनी महाराष्ट्रात राहून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. या विचारांनी त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाजाला एका छताखाली आनले होते. हे विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी राहुल कांबळे, बौद्धाचार्य राम गायकवाड, दीपक पाटोळे यांनी वंदना घेऊन कांशीराम यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. वामनदादा कर्डक यांचे शिष्य शाहीर दादू साळवे व त्यांच्या सहकलाकारांनी भीम गीतांसह आंबेडकरी चळवळीतील स्फुर्ती देणारे गीतं सादर केली.
