ड्युटी रजिस्टर नक्कल, ड्युटी बटवडा तक्ता व रात्र गस्तीची चौकशी करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची आक्रमक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे काही पोलीस कर्मचारींच्या विरोधात उपोषण करुन देखील संबंधितांवर चौकशी होऊन कारवाई झाली नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पुन्हा सोमवारी (दि.6 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे, त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व धमकावून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात तक्रार करुन 23 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले होते. या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वतीने सात दिवसाची मुदत मागून उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र संबंधितांवर चौकधी करुन कारवाई होत नसल्याने पुन्हा उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्यांनी कुठलाही गुन्हा नोंद नसताना माजी सैनिक प्रशांत ठुबे (रा. बाबुर्डी), बबन बर्डे (रा. वनकुटे) व समशुद्दीन सय्यद (रा. पोखरी) यांना जाणीवपूर्वक अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनमानी पद्धतीने मारहाण करून पोलीस स्टेशनला आणले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या निहाय पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांची ड्युटी बटवाडा व रजिस्टर नक्कल, पोलीस निरीक्षक रात्र गस्तीची दप्तर चौकशी, त्यांचे मोबाईल लोकेशन व मोबाईलची सीडीआर तक्रारीनुसार तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.