अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषण
कलेक्शनच्या कामासाठी त्याची बदली रद्द करुन त्याला थांबविण्यात आल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात अवैध दारु व वाळू माफियांकडून हप्ते गोळा करणार्या त्या पोलीस कर्मचारीची चौकशी करुन त्याची तातडीने बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
त्याची बदली रद्द करुन त्याला कलेक्शनच्या कामासाठी थांबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 18 जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
पारनेर पोलीस स्टेशनचा तो पोलीस कर्मचारी नेहमीच पैसे वसुलीच्या कारणावरून वादग्रस्त ठरत आहे. जो कर्मचारी पैसे गोळा करून आणतो आणि वरिष्ठांना पोहोच करतो त्या कर्मचार्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. तो कर्मचारी पोलीस स्टेशन पासून ते वरिष्ठ कार्यालयापर्यंत सर्वांना पैसे पोहोच करत आहे. या कर्मचार्याला पाठीशी घालण्याचे काम पोलीस अधिकारी करत आहे. पोलीस निरीक्षक देखील या प्रकरणात बघ्याची भूमिका घेत आहेत. त्या कर्मचार्याची बदल रद्द करुन त्याला या विशेष कामासाठी ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तो पोलीस कर्मचारी राजरोसपणे दारू व अवैध वाळू व्यावसायिकांकडून पैसे गोळा करत असून, पारनेर तालुक्यात अवैध दारू व वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पारनेरमध्ये पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहिली जात असल्याचे रोडे यांनी म्हंटले आहे.