हळदी-कुंकू कार्यक्रमात आरोग्याचा जागर
मनोरंजनापुरते नव्हे, तर समाजाला दिशा देण्यासाठी महिला एकत्र येत आहे -डॉ. रत्नाताई बल्लाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा जागर करीत हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. महिलांनी इतर कामकाजासह गृहकर्तव्य बजवताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक राहण्यासाठी वाण आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात मार्कंडेय महामुनीच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी मागील 22 वर्षापासून कार्य सुरु आहे. महिला फक्त मनोरंजनापुरते एकत्र येत नसून, समाजाला दिशा देण्यासाठी सामाजिक भान ठेऊन योगदान देत आहेत. कोरोना काळात अनेक गरजूंना मदत उपलब्ध करुन देण्यात आली. तर गरजू घटकांच्या शिक्षणासाठी, महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पद्मशाली स्नेहिता संघमचे सुरु असलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमात आरोग्यावर मार्गदर्शन करताना आहार तज्ञ डॉ. अदिती पानसंबळ म्हणाल्या की, पाश्चात्य संस्कृतीच्या आहार व जीवन पध्दतीने भारतीयांचे आरोग्य बिघडले असून, स्वयंपाक गृह आरोग्यदायी होण्यासाठी पुन्हा पारंपारिक अन्नाची गरज आहे. भविष्यात सदृढ आरोग्य, हीच सुखी कुटुंबाची संपत्ती राहणार आहे. निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी आहार व व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे.
आजच्या युगात निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर सकस आहाराला व्यायामाची जोड द्यावी लागणार. महिलांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनात कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी अनेक आजारांना महिलांना सामोरे जावे लागते. आरोग्यम धनसंपदा हेच जीवनाचे ब्रिदवाक्य बनविण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच महिलांच्या विविध आरोग्याच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
पाहुण्यांचा परिचय रेखा रेखा वड्डेपेल्ली यांनी करुन दिला. यावेळी मोठ्या खडतर परिस्थितीमध्ये अभ्यास करुन सीए झाल्याबद्दल श्रुतिका तडका हिचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना कोलपेक यांनी केले. आभार सपना छिंदम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पद्मशाली स्नेहिता संघमच्या महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
