मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश
महात्मा फुले यांचे कार्य व विचार देशाला प्रेरणादायी -रामदास फुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. तर या कार्यक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश देण्यात आला.
मंदिर परिसरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले व माजी सरपंच अंबादासजी पुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच जालिंदर शिंदे, समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराज होले, प्रा.भाऊसाहेब पुंड, भानुदास फुले, संतोष बेल्हेकर, सार्थक होले, आसाराम पुंड, तुकाराम होले, कृष्णा शेरकर आदींसह ग्रामस्थ व परिसरातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास फुले म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य व विचार देशाला प्रेरणादायी आहे. समाजाला सुशिक्षित करुन दिशा देण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतले. फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील. तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी व स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी शिक्षणाने क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.
