नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या कॅच द रेन या उपक्रमांतर्गत जनजागृती
समाजाचे उज्वल भविष्य पाण्यावर अवलंबून -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी निमगाव वाघात (ता. नगर) भिंतीवर संदेश देणारे चित्र रंगविण्यात आले. नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने कॅच द रेन या उपक्रमांतर्गत गावात हे अभियान राबविण्यात आले.
पाणी बचत म्हणजेच पाणी निर्मिती…, पाणी शुद्धीकरण नियमित करू सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू…, पावसाचे पाणी मौल्यवान त्याचे जतन करू…, पाणी हेच जीवन…, पाणी निसर्गाचे अनमोल रत्न… आदी पाणीचे महत्त्व सांगणारे संदेश गावातील भिंतीवर रंगविण्यात आले आहे. चित्रांच्या माध्यमातून पाणी बचतिचा संदेश देणार्या या भिंती आता नागरिकांमध्ये जनजागृती करु लागल्या आहेत. सजीव सृष्टीसाठी असलेले पाण्याचे महत्त्व चित्राद्वारे विशद करण्यात आले आहे.

रंगवलेल्या चित्राच्या भिंतीचे अनावरण ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व माजी सरपंच साहेबराव बोडखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, गोरख चौरे, भानुदास ठोकळ, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, दीपक जाधव, सोमनाथ आतकर, पेंटर मल्हारी लंके आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, समाजाचे उज्वल भविष्य पाण्यावर अवलंबून आहे. पाणी हेच जीवन असून, आज पाण्याचे महत्त्व लक्षात न घेतल्यास भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. मानवी जीवनासाठी पाणी अत्यावश्यक असून, पिण्या योग्य पाण्याचा साठा मर्यादीत आहे. विहिरीच्या बेसुमार पाणी उपसामुळे भूजल पातळी देखील खालवली आहे. याचा परिणाम शेतीवर होत आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन करुन ते पाणी साठवून ठेवण्याचे व जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.