नामस्मरणातून जीवनाचा अंधकार दूर होणार -श्रीनिवास महाराज घुगे
भक्तीरसात न्हाऊन निघाले गाव
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीराम नवमीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती सोहळ्याची सांगता ह.भ.प. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांच्या काल्याचे किर्तनाने झाली. या धार्मिक सोहळ्याने गावाचे वातावरण भक्तीमय बनले होते. तर वारकरी, ग्रामस्थ भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात तल्लीन झाले होते.

गावातील नवनाथ मंदिराच्या प्रांगणात दहा दिवस रंगलेल्या या भक्ती सोहळ्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. ह.भ.प. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांनी भक्ती व नामस्मरणातून जीवनाचा अंधकार दूर होणार आहे. या कलीयुगात नामस्मरणाला महत्त्व असून, नामस्मरणाने पाप नष्ट होऊन सुखी, समाधानी जीवनाचा आनंद मिळणार असल्याचे सांगितले. तर सत्यावर विश्व टिकले आहे. संतांनी देवाचे नामस्मरण करुन, ते अजरामर झाल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी श्रीकृष्ण लीलेवर प्रकाशझोत टाकला.

किर्तनाच्या प्रारंभी गावतून दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक पार पडली. यामध्ये टाळ-मृदंग घेऊन वारकरी व डोक्यावर तुलसी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. भक्ती गीतांवर भाविकांनी ठेका धरला होता. तर महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. बालवारकरी भगवे ध्वज व हातात टाळ घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
काल्याचे किर्तनसाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भागचंद जाधव, गोकुळ जाधव, अण्णा जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, भाऊसाहेब ठाणगे, श्याम जाधव, भरत बोडखे, गोरख फलके, चत्तर गुरुजी, भाऊसाहेब जाधव, नामदेव फलके, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत जाधव, मिराबाई बोडखे, लक्ष्मीबाई जाधव, लता फलके आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्रितपपूर्ती सप्ताहातंर्गत दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, हरीपाठ व किर्तनाने गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले. काल्याच्या किर्तनाच्या समारोपनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.