25 वर्षापुढील नागरिकांसाठी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे काम सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने 25 वर्षापुढील नागरिकांसाठी आधार कार्डमध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे बंधनकारक केल्याच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्ट व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधारकार्ड अद्यावतीकरणाचे शिबिर राबविण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराप्रसंगी एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके, सरपंच रुपाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, विठ्ठल फलके, महादेव उधार, बाळू उधार, आधार केंद्राचे संचालक नंदलाल ठाणगे आदी उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, सर्वच शासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक बाब बनली आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वृध्दांना आधार कार्ड अनिवार्य व गरजेचे आहे. शासनाने पूर्वी आधार कार्ड काढताना ओळखीचा व पत्त्याचा पुरावा घेतलेला नव्हता. 25 वर्षापुढील सर्वच नागरिकांचे असलेले आधार कार्डसाठी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. गावातील ग्रामस्थांना स्थानिक ठिकाणीच आधार अद्यावत करुन घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.