आपल्या अभिनयाने गटणे यांनी शहराचे नाव देश पातळीवर उंचावले -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते गटणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, राधिका मोहनीराज गटणे आदी उपस्थित होते.
राजू उर्फ मोहनीराज गटणे नाट्य, सिनेमा व विविध मालिकांमधून कार्य करत आहे. झी युवा वाहिनीवर बनमस्का, रुद्रम, प्रेम पॉयझन पंगा, तुझं माझं जमतंय या मालिकेत प्रमुख भूमिका त्यांनी साकारली. झी मराठी वाहिनीवर तुझं माझं ब्रेकअप, तुला पाहते रे, दार उघड बये… आदी मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनय केला आहे. तसेच सोनी मराठीवर कुसुम या मालिकेत त्यांनी काम केले आहे. त्यांनी कला क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय कलारत्न विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मोहनीराज गटणे यांनी नाट्य व टिव्ही वरील विविध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. कला क्षेत्रात त्यांनी योगदान देऊन शहराचे नाव देश पातळीवर उंचावले असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. गटणे यांनी कर्मभूमीत मिळालेल्या पुरस्कार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
