जगातील सर्वोच्च कार्यालयकडून पुरस्कार मिळवणारे अंदानी ठरले जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालय (युनायटेड नेशन अमेरिका) यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे अंदानी जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
सीए अंदानी यांना मेडल ऑफ एक्सलन्स उत्कृष्ट कार्य नोंद हा अत्यंत मानाचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सामाजिक संस्था, धार्मिक स्थळे यांचे उत्कृष्ट कर सल्लागार तसेच लेखा परीक्षण योग्य पद्धतीने केल्यामुळे आणि जागतिक मानव सेवा, जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे.

जगातील सर्वोच्च कार्यालय असलेले युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडे यावर्षी तब्बल 5 हजार अर्ज संपूर्ण जगातून प्राप्त झाले होते. त्यातील सर्व कागदपत्रे व कामकाजाची संपूर्ण तपासणी आणि पडताळणी करून उत्कृष्ट सेवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. माणुसकीच्या भावनेने जात, धर्म, पंथ व वर्ण भेदापलीकडे जाऊन केलेल्या कार्याबद्दल मानव जातीच्या एकोप्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
सीए शंकर अंदानी हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे (शिर्डी) मागील 14 वर्षापासून कर सल्लागार आहेत. तर अहमदनगर महानगरपालिका यांचेही ते मागील 15 वर्षापासून कर सल्लागाराचे काम पाहत आहेत. तसेच अनेक शासकीय संस्था, बँक यांचे लेखापरीक्षण ते करत आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर सौ. कदम, माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सीए अंदानी यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, हा सर्वात मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
