सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना एस.ए.डी.एम. प्रणालीद्धारे मिळालेल्या दिव्यांग प्रमाणपत्राऐवजी यु.डी.आय.डी. (स्वावलंबन) प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देणे सुरु आहे. यासाठी आठवडयातील प्रत्येक बुधवारी दिव्यांगांना यु.डी.आय.डी. चे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते तसेच दिव्यांगांची जिल्ह्यातील असलेली संख्या पाहता प्रत्येक शुक्रवारी तालुकानिहाय जिल्हा रुग्णालयामध्ये शिबिर देखील सुरु आहे.

यु.डी.आय.डी. चे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगांना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र काय असते? हे दिव्यांगांना माहीत नसल्याने याच गोष्टीचा फायदा घेऊन एजंट लोक लूट करीत आहेत. प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीच्या नावाखाली एजंटाकडून दिव्यांगांना गंडवले जात असून, त्यांच्याकडून एक हजार ते दहा हजार रुपयाची वसुली केली जात आहे. दिव्यांगाना तुमची टक्केवारी कमी होईल, तुम्हाला यु.डी.आय.डी. प्रणालीचे प्रमाणपत्र मिळणार नाही. दिव्यांगांना त्याच्या कागदपत्रामध्ये त्रुटी असल्याचे सांगून त्यासाठी मोठया साहेबांना पैसे दयावे लागतील, अशा थापा मारुन जशी दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती पाहून त्याप्रमाणे दिव्यांगांना लुटण्याचे प्रकार जिल्हा रुग्णालयामध्ये सुरु असल्याची चर्चा दिव्यांग क्षेत्रात सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिव्यांग सेवेच्या नावाखाली दिव्यांगांना लुटणार्या दलालांचा पर्दाफाश करण्यात यावा या मागणीचे निवेदन सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यानी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिव्यांगाची होणारी लूट बाबत अनेक दिव्यांगांनी संघटनेकडे तोंडी व मोबाईलवर संपर्क करुन तक्रारी केलेल्या आहेत. तसेच एका संघटनेने देखील नुकतीच जिल्हा रुग्णालयामध्ये एजंटाचा वावर असल्याबाबत तक्रार केलेली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाच्या दिवशी जे संशयीत प्रत्येक वेळी/वारंवार जिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांगाच्या व तज्ञ डॉक्टरांच्या अवती-भवती दिव्यांग सेवेच्या नावाखाली फिरत असतात त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करुन त्यांची माहिती लिखीत स्वरुपात स्थानिक पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणे करुन कोणत्याही दिव्यांगाची आर्थिक फसवणुक होणार नाही. तसेच एजंटामुळे जिल्हा रुग्णालयाचे नाव राज्य पातळीवर बदनाम देखील होणार नसल्याचे म्हंटले आहे. निवेदनाच्या प्रती उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र निशुल्क मिळते. जर कोणी एजंट दिव्यांग सेवेच्या आडून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पैश्याची मागणी करत असेल, तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला व सावली दिव्यांग संघटनेकडे लेखी तक्रार करावी. -बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)