• Thu. Oct 16th, 2025

दिल्लीतील श्रध्दा हत्याकांडाचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

ByMirror

Nov 22, 2022

शहरात आफताबच्या पुतळ्याचे दहण

समाजकंटक हिंदू-मुस्लिम रंग देऊन समाजात द्वेष पसरवीत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रद्धा वालकरची निर्दयीपणे हत्या करणारा आफताब पूनावाला या नराधमाच्या पुतळ्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने कोठला येथील चौकात दहण करण्यात आले. तर या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत नराधमाला भर चौकात फाशीवर लटकविण्याच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


आंदोलकांनी आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन निषेध नोंदविला. मुंबई वसईत राहणार्‍या श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारा तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत केली. या निर्दयी हत्येचे पडसाद देशभर उमटत असताना अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाने देखील या प्रकरणाचा निषेध नोंदविला. तर काही समाजकंटक हे प्रकरण मुस्लिम समाजाशी जोडून शहराचे वातावरण बिघडवत आहे. अशा माथेफिरू समाजकंटकाचा देखील पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागाणी देखील करण्यात आली.


या प्रकरणातून जातीवादी समाजकंटक हिंदू-मुस्लिम रंग देऊन समाजात द्वेष पसरवीत आहे. इस्लाम धर्मात लग्न अगोदर प्रेम आणि दोघांना बरोबर राहण्यास परवानगी नाही. या व्यक्तीचा इस्लाम धर्माशी संबंध नसून, त्याने केलेले कृत्य अमानवी आहे. या कृत्याचे कोणताही समाज समर्थन करणार नाही. या प्रकरणातून एका समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. आरोपीला जात, धर्म नसते. इस्लाम धर्माच्या शरीया कायद्यानुसार असे कृत करणार्‍याला फक्त भर चौकात फाशीची शिक्षा आहे.

घडलेली घटना निंदनीय व निषेधार्ह असल्याचे स्पष्ट करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपी आफताबला भर चौकात फाशी द्यावी व पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *