ब्रेन ट्रेसी बरोबर के. बालराजू यांचे सहलेखन
शिक्षणात मूल्यांची गरज -के. बालराजू
अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांनी भारतात शिक्षण पद्धती रुजवली, मात्र संस्कृती संपवली. सध्याची शिक्षण व्यवस्था फक्त नोकरी, रोजी-रोटीसाठी मर्यादीत झाली असून, शिक्षणात मूल्यांची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण समाज सुधारणेचे माध्यम असून, त्याला मूल्यशिक्षणाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन लेखक तथा सांदिपनी अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांनी केले.

के. बालराजू यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक ब्रेन ट्रेसी यांच्या बरोबर सहलेखन केलेले द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअरचे पुस्तक जगभर प्रकाशित झाले असून, नुकतेच ते भारतातही युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पुस्तकाची माहिती देताना बालराजू बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षण व्यवस्था शाश्वत राहिली नसून, एका जुगारासारखी बनली आहे. मुलांच्या माध्यमातून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जात आहे. शेवटी त्यामध्ये यश येणार की अपयश हे माहित नाही. विविध क्षेत्रात मोजक्या नोकरी व जागा आहेत. त्यामध्ये ठराविक विद्यार्थी पात्र ठरतात व इतर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनते. मुलांच्या भवितव्यासाठी अंधविश्वासाने पैसा उधळू नये, त्यांचे कला, गुण, क्षमता ओळखावी व त्या दिशेने त्यांना घडवावे. जीवनातील यशासाठी नियोजन करा, नियोजन नसलेल्या गोष्टींमागे धावून वेळ व पैसा वाया घालवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणप्रणाली मूल्यशिक्षणावर आधारली गेल्यास चांगला समाज घडून इतर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शिक्षणात फक्त आयक्यू पाहिला जातो, मात्र इमोशनल व सोशल प्रश्नांवर लक्ष दिले जात नाही. जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे. त्या शिक्षणात अंतर्भूत नाही. गुणांच्या स्पर्धेमुळे विद्यार्थी तणावपूर्ण जीवन जगत आहे. यामुळे युवकांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही वाढले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअर या पुस्तकाची माहिती देताना बालराजू म्हणाले की, या पुस्तकात सहलेखनासाठी ऑडिशन्स घेण्यात आले. लेखनाची पूर्वी पासूनच आवड असल्याने यामध्ये निवड झाली व जागतिक किर्तीचे लेखक ब्रेन ट्रेसी यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या टाळेबंदीत या पुस्तकासाठी लेखन केले. या पुस्तकात 26 विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी आपल्या यशाचे सिक्रेट्स मांडले आहे. प्रत्येक व्यक्तीचे प्रेरणादायी लेखन हे युवकांना काही तरी नवीन शिकवत आहे. जगभर ही पुस्तक उपलब्ध झाली असून, मागणी नूसार त्यांचे इतर भाषेतही रुपांतर होणार आहे. ही पुस्तक विद्यार्थ्यांना ई-बुकच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही पुस्तक उपलब्ध होण्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या लायब्ररीसाठी मोफत दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भविष्यात अजून दोन पुस्तके येत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणार्या समस्या व ऑल इंडिया रँकर्स कसे बनावे? ही दोन पुस्तके युवकांना मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर बोलताना शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. हे थांबविण्यासाठी पालकांमध्ये जागरुती करण्याचे काम देखील केले जात आहे. सांदिपनी अकॅडमीच्या माध्यमातून सुसंस्कारी विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरु आहे. यशासाठी फक्त कष्ट करुन उपयोग नाही, त्या कष्टाला योग्य दिशाची गरज असते. पालक-विद्यार्थी फक्त परीक्षांची तयारी करत आहे. मात्र जीवनाचे ध्येय, उद्दीष्ट याकडे दुर्लक्ष करत आहे. हजारो चाणक्य घडवून, लाखो चंद्रगुप्त तयार करण्याचा उद्देश असून, यामुळे सशक्त भारताचे निर्माण होणार असल्याचेही बालराजू यांनी सांगितले.