त्या पोलीस अधिकारी व कर्मचारींची चौकशीची मागणी
दोन वेळा उपोषण करुनही दखल घेतली जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आक्रमक पवित्रा
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे काही पोलीस कर्मचारींच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर दोन वेळा उपोषण करुन देखील संबंधितांवर चौकशी होऊन कारवाई झाली नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने थेट मुंबई येथील पोलीस महासंचालकांच्या कार्यालया समोर पिडीत तक्रारदारांसह अर्धनग्न आंदोलन करुन बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली. तर संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री कार्यालय व पोलीस महासंचालक कार्यालयाला देण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे, त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व धमकावून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात तक्रार करुन 23 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले होते. या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वतीने सात दिवसाची मुदत मागून उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र संबंधितांवर चौकधी करुन कारवाई होत नसल्याने पुन्हा उपोषण करण्यात आले. फक्त आश्वासने देऊन ठोस कारवाई केली गेली नाही. यापूर्वी पारनेर पोलीस स्टेशनच्या एका कर्मचारीने महिलेची तक्रार घेण्यास विलंब केला म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले.
मात्र या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महिलांना अपशब्द वापरुन धक्काबुक्की केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या पुरुष मंडळींवर कोणतेही गुन्हे नसताना त्यांना घेऊन जावून मारहाण केली. येत्या पंधरा दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालकांच्या कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन करुन बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्यांनी कुठलाही गुन्हा नोंद नसताना माजी सैनिक प्रशांत ठुबे (रा. बाबुर्डी), बबन बर्डे (रा. वनकुटे) व समशुद्दीन सय्यद (रा. पोखरी) यांना जाणीवपूर्वक अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनमानी पद्धतीने मारहाण करून पोलीस स्टेशनला आणले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या निहाय पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांची ड्युटी बटवाडा व रजिस्टर नक्कल, पोलीस निरीक्षक रात्र गस्तीची दप्तर चौकशी, त्यांचे मोबाईल लोकेशन व मोबाईलची सीडीआर तक्रारीनुसार तपासणी करावी व यामध्ये दोषी असणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.