महिलांचे शोषण करणार्या भाजप नेत्यांचा खरा चहेरा जनते समोर आल्याचा आरोप
केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नेत्यांवर कारवाई होत नाही -अॅड. विद्या शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओ वरुन महिलांचे शोषण करणार्या भाजप नेत्यांचा खरा चहेरा जनते समोर आला असल्याचा आरोप करुन आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात निषेध नोंदविण्यात आला. तर किरीट सोमय्या यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आपच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. विद्या शिंदे, शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, उपाध्यक्ष संपत मोरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, काकासाहेब खेसे, विक्रम क्षीरसागर आदींसह महिला उपस्थित होत्या.
माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओ वरुन खळबळ उडाली असताना, त्याचे पडसाद शहरातही पहायला मिळाले. आपच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. विद्या शिंदे निषेध नोंदविताना म्हणाल्या की, भाजपचे नेते महिलांचे शोषण करत असल्याचे अनेक तक्रारी पुढे येत असल्या तरी, केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नेत्यांवर कारवाई होत नाही. पिडीत महिलांचे शोषण करुन त्यांचा आवाज दाबला जातो. हा फक्त ट्रेलर पुढे आल्याने भाजप नेत्यांचा खरा चेहरा समाजा समोर आला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, हिंदू संस्कृती व संस्काराची भाषा करणार्या भाजप पक्षाने अशा चारित्र्यहीन नेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. काही नेते सार्वजनिक जीवनात लोकांसमोर वेगळे चारित्र्य दाखवितात. तर खर्या जीवनात बंद दरवाज्यात आपले गुण दाखवीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संपत मोरे म्हणाले की, सत्ताधारी नेते कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत महिलांचे शोषण करत आहे. ते सोमय्या यांच्या प्रकरणाने पुढे आले. या प्रवृत्तींवर कारवाई न केल्यास महिलांची सुरक्षा धोक्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.