जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
रस्त्यावरील भाजी विक्रेते, विविध दुकाने व टपर्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकाने व टपर्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड व नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणात आरती गायकवाड, मयुरी गायकवाड, धन्यता गायकवाड, अंजू सकट, सागर सकट, रंजिता रॉय आदी सहभागी झाल्या होत्या.
एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. मात्र प्रत्येक विक्रेता जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोहचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्री व टपर्यांचे अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात आली आहे. यामध्ये भंगारवाले, गॅरेज, सलून आदी व्यावसायिकांचा समावेश आहे. तर काही टपर्यांमध्ये मटका, जुगार सारखे अवैधधंदे देखील तेजीत सुरु आहे. हा बाजार महामार्गाला लागून भरत असल्याने वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, नागरिकांना जीव मुठीत धरुन या भागातून जावे लागत आहे. येथे खरेदीला आलेला ग्राहक वर्ग देखील रस्त्यावर वाहने लावतात किंवा गाडीवर बसल्या-बसल्या भाजी व इतर साहित्य खरेदी करतात. या बेशिस्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जीव धोक्यात घालून दररोज हा बाजार भरत आहे. या प्रश्नावर तोडगा काढून, भाजीविक्रेत्यांना मागे सरकून बसविण्यासाठी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला होता. रस्त्याच्या मागील प्रशस्त जागेची स्वच्छता करुन त्यांना बसविण्याचे व टपर्या मागे हटविण्याचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत एमआयडीसी प्रशासन व पोलीस स्टेशनला कळविण्यात आले होते. मात्र त्यांनी सहकार्य न केल्याने हा विषय बारगळला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये हा धोकादायक बाजार नागरिकांच्या जीवावर उठला आहे. बाजारात एखादे अवजड वाहन घुसल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा बजार शिस्तबध्द पध्दतीने भरविण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्यापेक्षा रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा दंडाधिकारी (गृह शाखा) यांनी उपोषण कर्त्यांची दखल घेऊन याप्रकरणी कारवाई करण्याबाबत एमआयडीसी उपाभियंता व जागतिक बँक प्रकल्प विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना आदेश काढल्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.