राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नद्यांच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची कामे होण्यासाठी नद्या-नाले मोजमाप करण्याचे आदेश कृषी विभागाला द्यावे व नद्यांच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे चांगल्या पध्दतीने झाल्यास त्याचा फायदा भविष्यात सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. सध्याच्या काळात नद्या नाल्यांचे क्षेत्र सततचे पाऊस व अतिवृष्टीने जमीन लेव्हल झालेली आहे. पूर्वीच्या नकाश्याप्रमाणे नद्या-नाल्यांची लांबी रुंदी, खोली त्यांचे मोजमाप करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात यावे. शेतकर्यांच्या विकासासाठी कामे पाणी आडवा व जिरवण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे प्रत्येक नद्यावर दोन किलोमीटर अंतरावर बांधण्याची गरज आहे.
या कामासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध नसेल, तर कृषी विभागाच्या नकाशाप्रमाणे नद्या नाल्यांची जी खोली आहे, त्या पर्यंत वाळू आणि पोयटा उचलण्याची निविदा काढावी. त्या माध्यमातून शासनाला जो निधी प्राप्त होईल, तो सर्व निधी शेतकर्याच्या विकास कामासाठी व बंधारे बांधण्यासाठी वापरण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या विविध प्रश्नांसाठी सरकारकडे विविध मागण्याकरीत आहे. मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक पक्षाच्या राजकीय नेत्यांनी साकळाई पाणी योजनेसाठी आश्वासन दिले. आज पर्यंत शेतकर्यांचे स्वप्न साकार झालेले नाही.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांनी थेट समुद्रात वाहून जाणार्या पाण्याचा प्रकल्प हातामध्ये घेण्याचा विचार केला आहे. मात्र कोट्यावधी रुपये शासनाने खर्च करण्यापेक्षा नद्यांच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडवता येणार असल्याचे ढवळे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
