त्या अनाधिकृत व विनापरवाना व्यावसायिक बांधकाम विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरुन कारवाईच्या हालचालींना वेग
पुढील तारखेला न्यायालयात जाण्यासही धोका असल्याचे स्पष्टीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी (ता. नगर) या ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत व विनापरवाना व्यावसायिक बांधकामावर कार्यवाही होण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे संबंधितांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असताना, सदर बांधकाम व्यावसायिकांकडून जीविताला धोका निर्माण झाल्याने संरक्षणासाठी व पुढील तारखेला न्यायालयात जाण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी याचिकाकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी (ता. नगर) या ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम व्यवसायिकांनी ग्रामपंचायतचा बनावट सही, शिक्का बनवून ग्रामपंचायत परवाना असल्याचे भावसवून मोठ्या प्रमाणात रो हाऊस, टूईन बंगलो, व्यावसायिक गाळे, अपार्टमेंट बांधून विक्री केली. या बांधकामासाठी लागणारा परवाना बनावट असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
यासंदर्भात सन 2018 मध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या माध्यमातून सदर प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला आहे. नुकतेच औरंगाबाद उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे अहवाल न दिल्याने त्यांच्या पगारातून पाच हजार रुपये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तर भिंगार तलाठी यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून जे बांधकाम झालेले आहे, त्याची पूर्ण माहिती मागवली आहे. कागदपत्रे बनावट असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्व बांधकाम व्यवसायिकांची बैठक झाली असून, यामध्ये मला संपविण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती मिळाल्याचे याचिकाकर्ते भिंगारदिवे यांनी निवेदनात म्हंटले आहे. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याने याचिका दाखल केल्याचा राग मनात धरुन मला संपविण्याचा कट रचण्यात येत आहे. तर याबाबत 27 जुलैला न्यायालयात सुनावणी असल्याने तेथे जाताना किंवा येताना घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकरणी दखल घेऊन तात्काळ मला व माझ्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे.