आखाड्याची मातीत टाकले 400 लिटर दूध व हळद, दही, तेल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यासाठी लाल माती सज्ज करण्यात आली आहे. आखाड्याच्या मातीत 400 लिटर दूधसह इतर खाद्य टाकण्यात आले.
आखाड्यातील 16 ब्रास लाल मातीसाठी पैलवान राम लोंढे व श्याम लोंढे परिवाराच्या वतीने 400 लिटर दूध, हळद, दही, तेल आदी खाद्य देण्यात आले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने ही तीन दिवसीय कुस्ती स्पर्धा होणार असून, त्यासाठी आखाड्याची माती तयार करण्यात आली आहे.
प्रारंभी मातीत भगवान शंकराची पिंड तयार करुन त्यावर हळद टाकून दूधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, पै. श्याम लोंढे, पै. राम लोंढे, तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, पै. संतोष नाना कोतकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे, मनोज बारस्कर, बंडू बडे, शेखर तांबे, ओंकार शिंदे, शुभम लोंढे, ओम लोंढे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे माती व गादी विभागात रंगणार आहे.