पुन्हा कोरोनाचे संकट ओढवू नये, सर्वधर्मिय धर्म गुरुंसह प्रार्थना
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत शहरात सुरु झालेल्या व कोणत्याही संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेलेल्या घर घर लंगर सेवेला मंगळवारी (दि.21 मार्च) तीन वर्ष पूर्ण झाले. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सुरु झालेली ही सेवा आजही अविरत सुरु असून, पुन्हा असे संकट मानव जातीवर ओढवू नये, यासाठी लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात सर्वधर्मिय धर्म गुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करण्यात आली. यावेळी मानव जातीच्या कल्याणासाठी व धार्मिक एकतेसाठी देखील प्रार्थना पार पडली.
तारकपूर येथील अन्न छत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुरुद्वाराचे बाबाजी कर्नलसिंग, मौलाना रहेबर साबीर अली, मंदिराचे पुजारी काळू पंडित, चर्चचे रेव्ह. सतीश तोरणे यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करुन लंगर सेवेत योगदान देणार्यांना आशिर्वादीत करुन, कोरोनाचे संकट पुन्हा कधीही ओढवू नये, अशी प्रार्थना केली. यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, जाहिद अली, कैलाश नवलानी, गोविंद खुराणा, राजू जग्गी, विजय मनी, दलजीत वधवा, सतीश गंभीर, सुनिल थोरात, प्रमोद पंतम, अनिश आहुजा, प्रशांत मुनोत, जयश्री साठे, सविता पारधे आदी उपस्थित होते.

19 मार्च 2020 साली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्यानंतर 21 मार्च पासून लंगर सेवा सुरु करण्यात आली होती. मागील तीन वर्षापासून घर घर लंगरसेवा निस्वार्थ भावनेने दुर्बल घटकांना आधार देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून माणुसकीच्या भावनेने अविरतपणे गरजूंना अन्नदान करण्यात आले. ही सेवा फक्त अन्ना पुरती मर्यादीत न ठेवता जेथे गरज लागेल तेथे लंगर सेवेचे सेवादार देवदूत प्रमाणे उभे राहिले. जनावरांच्या चार्याचा प्रश्न असो की, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन. प्रत्येक संकटांना तोंड देऊन वंचित घटकांना जगण्याची उमेद लंगर सेवेने दिली. शहरातील लाखोंची भूक भागवून अनेक गरजूंना आधार देत हजारो कोरोना रुग्णांना जीवन देण्याचे कार्य लंगर सेवेने केले असल्याची भावना उपस्थित धर्मगुरुंनी व्यक्त केली.
तीन वर्षापुर्वी सुरु झालेल्या लंगर सेवेने कोरोना महामारीचे असो किंवा महापुरचे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात दिला. टाळेबंदीत अनेक कामगार, गरजू घटकांसह कोविड सेंटर व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण पुरविण्यात आले. या बरोबर ऑनलाईन शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना जुने स्मार्ट फोन, लॅपटॉप पुरविण्यात आले. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असताना ऑक्सिजन सिलेंडरची निशुल्क सेवा पुरविण्यात आली. लंगरची सेवा आजतागायत तारकपूर येथे अन्न छत्राच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली.
