आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तचा सामाजिक उपक्रम
मुलांच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचा सर्व खर्च उचलणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संकटात पालक गमावलेल्या एका कुटुंबातील अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व संवेदनशील मनाने शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी स्विकारले. अनेकांच्या बिकट परिस्थितीत आधार देऊन जीवनात उभे करणारे आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणेतून बोडखे यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. तर अनाथ मुला-मुलीचा ग्रॅज्युएशन पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च स्विकारला आहे.
जामखेड रोड येथील एका कुटुंबातील मुलगी इयत्ता सहावीत तर मुलगा इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. आई नसल्याने वाहन चालक असलेले वडिलच त्यांचा सांभाळ करत होते. मात्र कोरोनाच्या लाटेत वडिलांचे देखील निधन झाल्याने या मुला-मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. आजी धुणे-भांडी तर आजोबा बांधकामाची राखणदारीचे काम करुन, आजी-आजोबा या मुलांचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह व शिक्षणाचा खर्च बिकट बनला असताना शिक्षक असलेले बोडखे यांनी संवेदनशील मनाने या दोन्ही मुला-मुलींचे पालकत्व स्विकारुन शिक्षण क्षेत्रात एक आदर्श समोर ठेवला आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या मुला-मुलीस संपूर्ण शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे पालकत्व स्विकारण्यात आले. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, प्रा. सुनील पंडित, प्रा. जयसिंग दरेकर, प्रा. सुनिल सुसरे, प्रा. हबीब शेख, प्रा. ज्ञानदेव बेरड, प्रा. बबन शिंदे, विराज बोडखे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक संवेदना जपणार्या शिक्षकांमुळे समाजात बदल घडणार आहे. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवनात उभे करण्याचे बाबासाहेब बोडखे यांचे सातत्याने सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोरोना काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन निराधार, दिव्यांग व मतीमंद मुलांसाठी वर्षभर त्यांचे उपक्रम सुरु असतात. अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेली शैक्षणिक मदत व कोरोनात पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्वाचे उपक्रम दिशा देणारे आहे.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, अनेक गरजू, निराधार विद्यार्थ्यांना अरुणकाका जगताप यांनी आधार देऊन त्यांचे संसार उभे करण्याचे काम केले. माझ्या बिकट परिस्थितीमध्ये देखील त्यांनी आधार दिला. त्यांच्या प्रेरणेने या ऋणातून उतराई होण्याच्या उद्देशाने दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले असून, त्यांची उच्च शिक्षणा पर्यंतची सपूर्ण जबाबदारी स्विकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, पालक गमावलेल्या मुलांना शिक्षणासाठी मदतीची गरज असते. अशा मदतीने त्यांना आधार व जीवनात भरारी घेण्यास बळ मिळणार आहे. सामाजिक भावनेने असे उपक्रम राबविणे काळाची गरज बनली असून, प्रत्येकाने दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतल्यास सर्वांपर्यन्त मदत पोहोचू शकणार असल्याचे सांगून, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.