लेझीम, झांज, लाठी-काठी आदी विविध पथकांनी जिंकली मने
शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय बनला होता. लेझीम, झांज, लाठी-काठी पथकाने कलेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. भगवे ध्वज हातात घेऊन मिरवणुकीतील मावळ्यांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
जेएसएस गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया व निकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव वेस येथून शिवाजी महाराजांची आरती करुन मिरवणुकीला प्रारंभ झाले. यावेळी राजू लोंढे, गणेश जाधव, अजय पाटील, प्रकाश चंगेडिया, सोमनाथ बनकर, अजित पवार, राजेंद्र कुलथे, संदीप घिगे, सिद्धार्थ भावले, भाऊसाहेब नारळे, नितीन रासकर, सचिन पोखरणा, संदीप भोर, भरत काकडे, सुहास झेंडे, माजी नगरसेवक सुनील कोतकर आदी उपस्थित होते.

मिरवणुकीत शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे आदी विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या शिवजयंती मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी पालकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांनी तानाजी मालुसरे व शिवरायांचे प्रेम यावर सादर केलेल्या नाटिकेस नागरिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर बालाजी कॉलनी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने या मिरवणुकीचे स्वागत करुन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाबरोबर शाळेत संस्काराचे देखील धडे देण्याचे काम केले जात आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेऊन त्यांची पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत आपल्या कला-गुणांचे देखील सादरीकरण केल्याचे सांगितले. निकिता कटारिया यांनी शाळेत सर्व महापुरुषांची जयंती उत्सव व सर्व धर्माचे सण साजरे करुन सुंस्कारी विद्यार्थी घडविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
