दुधाचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन धनादेश न वटल्याचे प्रकरण
पैसे न दिल्यास आणखी तीन महिने शिक्षा, जिल्हा न्यायालयाचे आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- दुधाचा पुरवठा करणार्यास दिलेल्या धनादेश न वटल्याने श्री भवानी अॅग्रो अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि.चे संभाजी रामभाऊ लगड व नामदेव दामू मोरे या दोघा आरोपींना प्रथम न्याय दंडाधिकारी श्रीमती व्ही.व्ही. सुपेकर यांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मुदतीत पैसे न दिल्यास आनखी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
नागरदेवळे (ता. नगर) येथील तुळजाभवानी दूध संकलन केंद्राचे शत्रुघ्न गबाजी खरपुडे हे दूध उत्पादक शेतकर्यांकडून दूध संकलन करुन एमआयडीसी येथील श्री भवानी अॅग्रो अॅण्ड मिल्क प्रोडक्शन या कंपनीला दूध पुरवठा करत होते. तक्रारदार खरपुडे यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या आर्थिक वर्षात 59 लाख 17 हजार 395 रुपये किमतीच्या दुधाचा पुरवठा केला होता. यातील काही रक्कम आरोपींनी त्यांना दिली, उर्वरित 18 लाख 86 हजार 97 रुपये मिळावी यासाठी खरपुडे यांनी कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
कंपनीच्या वतीने खरपुडे यांना रकमेचे धनादेश दिले गेले, परंतु बँक खात्यात पैसे शिल्लक नसल्याने धनादेश वटले नाही. याप्रकरणी फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला. सर्व पुराव्यांची पडताळणी करून न्यायालयाने आरोपींना दोन वर्षाची शिक्षक सुनावली आहे. तसेच फिर्यादील पुढील दोन महिन्यात 18 लाख 86 हजार रुपये व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
मुदतीत पैसे न दिल्यास आणखी दोन महिन्याची शिक्षा सुनावण्यात येईल असा निर्णय न्यायालयाने दिला असल्याची माहिती फिर्यादी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तक्रारदार खरपुडे यांच्या बाजूने अॅड. विनायक दारुणकर यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. सचिन फुलसौंदर यांनी सहकार्य केले.