• Mon. Dec 1st, 2025

एका ठिकाणची मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी बंधारा बांधणार्‍या त्या उपअभियंत्याची चौकशी व्हावी

ByMirror

Jun 14, 2023

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

अन्यथा सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी कामे करणार्‍या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या त्या उपअभियंताची सदर प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्फत मौजे खादगाव टाकली (ता. नगर) येथील गट नंबर 425, 432 मध्ये सुमारे 20 लाख रकमेचा साठा बंधारा बांधणे बाबत सर्वेक्षण झाले. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर तांत्रिक मंजुरीसाठी प्रकरण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यानुसार त्या कामासाठी 19 लाख 99 हजार 891 किमतीच्या साठा बंधारासाठी 10 मार्च 2021 रोजी मंजुरी दिली गेली. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी त्यानुसार काम न करता मनमानी करत ठरलेल्या गट नंबर मध्ये काम न करता त्या ठिकाणापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबच्या जागेवर काम केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


या प्रकरणात बदललेल्या स्थळाचा प्रस्ताव सादर करून, मंजुरी घेऊन काम करू शकत होते. मात्र त्यांनी तसे न करता परस्पर काम करून बिल अदा केले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी असलेले उपअभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी, नुकतेच ते सेवानिवृत्त झाले असून याप्रकरणाची चौकशी होत नाही तो पर्यंत त्यांना देय असलेली पेन्शन फंड देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील प्रकरणाची चौकशी न झाल्यास सोमवारी (दि.19 जून) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रोडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *